उत्तरप्रदेश, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची सून अपर्णा यादव भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. भाजपा नेत्याच्या दाव्यामुळे काही आठवड्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.
पक्षातील तीन मंत्री आणि काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखिलेश यादव यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर भाजपाकडूनही जशास तसं उत्तर दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. हरियाणाचे भाजपा प्रभारी अरुण यादव यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत सांगितलं की, “मुलायम सिंग यादव यांचा लहान मुलगा प्रतिक याची पत्नी अपर्णा यादव उद्या भाजपात प्रवेश करणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता पक्षप्रवेश होईल”.