‘संकटमोचक’च सापडले संकटात

0
16

जळगाव : प्रतिनिधी
महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असतांनाच महानगरपालिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपाचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचे वृत्त येऊन धडकल्यामुळे भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन व आ. राजूमामा भोळे यांना जोरदार धक्का बसला असून ‘संकटमोचक’च संकटात सापडल्याची प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक सर्व शक्तीनिशी लढविण्याची जय्यत तयारी केली असून आज सकाळी या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज मनपातून घेण्यात आले आहे. महापौरपदी जयश्री सुनिल महाजन तर उपमहापौरपदासाठी भाजपाचे कुलभूषण पाटील (बंडखोर) यांना संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनपा निवडणुकीला अडीच वर्षाचा कालावधी झाला असून निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारत ५७ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे मनपावर माजी मंत्री आ. गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता प्राप्त झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेला १५ व एमआयएमला ३ जागा मिळाल्या होत्या. आता १८ मार्च रोजी महापौर व उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपाने यापूर्वीच दोन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज घेतले असून या पक्षाकडून महापौर पदासाठी प्रतिभाताई कापसे व उपमहापौर पदासाठी धिरज मुरलीधर सोनवणे यांची नावे जवळजवळ निश्चित करण्यात आली असतांनाच पक्षातंर्गत नाराजीमुळे काल मनपा राजकारणात राजकीय भूकंप उडाला. सुमारे २७ नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे वृत्त धडकल्याने भाजपाच्या गटात खळबळ उडाली आहे. शिवसेना नगरसेवकांसह भाजपाचे फुटीर नगरसेवक मुंबईला रवाना झाले असून आज ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मनपाच्या निवडणुकीच्या वेळी भाजपा नेते आ. गिरीष महाजन यांनी पक्षाची तिकिटे देतांना माजी मंत्री सुरेशदादा जैन समर्थक तसेच शिवसेना व राष्ट्रवादीच्या काही प्रमुख दावेदारांना फोडण्यात यश प्राप्त केले होते व त्यांना उमेदवारीही दिली होती. सध्या भाजपाचे बहुमत असले तरी पूर्वाश्रमीचे बहुतेक नगरसेवक भाजपामधून फुटल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान, माजी महापौर ललित कोल्हे यांनी तर भाजपाला ‘जय श्रीराम’ करून अडीच वर्षानंतर पुन्हा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केले आहे. मनपा राजकारणातील या हालचालींचे काल प्रमुख केंद्र ठरले ते राष्ट्रीय महामार्गावरील लढ्ढा फार्म हाऊस. नितीन लढ्ढा यांच्या निवासस्थानी काल दिवसभर वेगवान हालचाली सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत नितीन लढ्ढा यांच्यासह महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे, अमर जैन आदी कार्यकर्ते या हालचालींमध्ये आघाडीवर होते.
भाजपा बजावणार व्हीप
आपल्या पक्षाला फुटीची लागण झाल्यानंतर आज भाजपातर्फे सर्वच नगरसेवकांना व्हीप बजावण्यात येत आहे. डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून पक्षासोबत असलेल्या नगरसेवकांना सहलीला रवाना करण्यात आले आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांना हा व्हीप जारी करण्यात येणार असून फुटीर नगरसेवकांना अपात्रतेच्या कारवाईची भिती दाखविण्याचा खटाटोप पक्ष सूत्रांकडून केला जात आहे. मात्र शिवसेना या नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने सोयीचा मार्ग काढण्याच्या तयारीस लागली आहे.
फुटीर नगरसेवकांमध्ये नेमके कोण?
भाजपातून अचानक फुटून शिवसेनेला पाठिंबा देणारे नगरसेवकांची नेमकी संख्या समजू शकली नसली तरी भाजपाचे २४ नगरसेवक शिवसेनेसोबत गेल्याचे चित्र रात्री स्पष्ट दिसत होते. त्यानंतर आणखी तीन, चार नगरसेवक नवीन गटात सहभागी झाल्याचे विश्वसनीय वृत्त्त आहे. त्यामुळे भाजपाच्या ५७ पैकी २७ नगरसेवकांनी बंड पुकारल्याचे दिसत आहे. आता भाजपाकडे केवळ ३० नगरसेवक असल्याने पक्षासमोर मोठे संकट उभे राहीले आहे तर शिवसेनेचे १५ व एमआयएमचे तीन असे एकूण १८ नगरसेवक विरोधकांकडे असून भाजपाचे फुटीर २७ नगरसेवक गृहीत धरले तर ही संख्या बहुमतापेक्षाही जास्त म्हणजे ४५ वर जाते. फुटीर नगरसेवकांमध्ये पूर्वीचे सुरेशदादा समर्थक बहुतांश असले तरी विद्यमान उपमहापौर सुनिल खडकेंसह काही खडसे समर्थक नगरसेवकही असल्याचे विश्वसनीय गोटातील वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here