जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचा रक्तदान शिबिराचा उपक्रम हा स्तुत्य असून संकटकाळी काम करतो तोच खरा कार्यकर्ता असतो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले.
शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी आघाडीच्यावतीने आयोजीत रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खडसे बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील तर प्रमुख म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनिष जैन उपस्थित होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या सूचनेनुसार जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले. राज्यभरात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यामागील हेतू असल्याचे नेमाडे यांनी या वेळी सांगीतले.
जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात रक्तदान शिबीर आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. तर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी विभागाने रक्तदान शिबीर आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने कोरोना महामारीच्या काळात जनतेला मदत करण्याच्या सूचना केल्या.
शिबिरा प्रसंगी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा महिला अध्यक्ष वंदना चौधरी, राज्य सरचिटणीस ओबीसी विभाग डॉ. सुषमा चौधरी, राज्य प्रवक्ते योगेश देसले, वाल्मिक पाटील, लीलाधर तायडे, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी,जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, सुनिल माळी आदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ओबीसी जिल्हा संघटक भरत चौधरी यांनी केले. रक्त संकलनासाठी गोदावरी ब्लड बँकेचे डॉ. प्रियंका कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
यशस्वितेसाठी ओबीसी महानगराध्यक्ष कौसर काकर, नीलेश कोलते, नीलकंठ पाटील आदी उपस्थित होते.