जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा श्रीराम मंदीर निधी समर्पण समितीतर्फे श्रीराम मंदिर अर्थात राष्ट्र मंदिर या संकल्पनावर प्रकाश टाकणार्या ‘राष्ट्र मंदिर टॉक शो’चे आयोजन १२ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी नाट्यगृहात केले आहे. अभियानानिमित्त होणार्या विविध कार्यक्रमांची माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्यवाह किशोर चौधरी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
‘राष्ट्र मंदिर टॉक शो’मध्ये श्री महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज (फैजपूर), भाजप नेते माधव भंडारी (मुंबई), डॉ. यशस्विनी तुपकरी (संभाजीनगर), जळगाव पीपल्स को-ऑप. सहकारी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, तसेच डॉ. प्रसन्न पाटील (संभाजीनगर) हे प्रमुख वक्ते सहभागी होतील. अयोध्येत साकारणारे निधी अभियान जिल्ह्यातील वस्ती, गाव, शहर पातळीवर राबवले जाईल. अभियानाच्या प्रचार-प्रसारसाठी बैठकांसह विविध कार्यक्रमही होत असल्याचे किशोर चौधरी यांनी सांगितले. या वेळी विहिंपचे श्रीरंग राजे, देवेंद्र भावसार, समन्वयिका प्रतिमा भावसार उपस्थित होते.
शनिवारपासून कार्यक्रम
९ जानेवारीला पांजरपोळ संस्थानात संत संमेलन, १० जानेवारीला शहरातील विविध वस्तीत महिलांनी रामायणातील प्रसंगांवर आधारित रांगोळी काढण्याचे आवाहन समितीने केले आहे. १२ जानेवारीला शिवतीर्थापासून मोटरसायकली रॅली काढून आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात रॅलीचा समारोप होईल, असे सांगण्यात आले.