श्री गणेशाचे जल्लोष व प्रसन्न वातावरणात अनेकांकडे आगमन झाले आहे. गणेशाच्या आगमनाची तयारी आधीच आपल्याकडे सुरु होते. श्रीगणेशाला प्रिय नैवेद्य असो वा पत्री फुलं दुर्वा सर्व गोष्टीची जमवाजमव होत असते. गणपती बाप्पाला वाहण्याकरीता आवडीची फुले पत्र इत्यादी आणतांना त्यांची औषधी गुण त्यांचे आकार रुप गंध याची माहीतीही मिळते. निसर्ग आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो हे देखील कळते. गणपतीला प्रिय असलेल्या वनस्पतींची आरोग्य हितकर माहिती बघूया –
दूर्वा – गणपतीला दूर्वा अवश्य वाहिल्या जातात. दूर्वा या ऋतुत भरपूर उपलब्ध असतात. या दूर्वाचे औषधी गुण काय तर या उत्तम रक्तस्तंभक आहेत. नाकातून रक्त निघण्याचा त्रास होत असेल तर नाकात दूर्वारसाचे थेंब उपयुक्त ठरतात. दूर्वारस खडीसाखरेसह घेतल्यास फायदा होतो. उष्णता कमी करणारी वनस्पती असल्यामुळे मूत्रदाह, रक्तदुष्टी विकारांवर उपयोगी ठरते. गर्भाशयाला बल देणारी तसेच पित्त वाढल्याने निर्माण होणाऱ्या स्त्रीरोगांवर दूर्वांचे कल्प प्रभावी ठरतात.
जास्वंद – जास्वंदाचे फूल गणपतीला प्रिय असल्याने हमखास आपण आणतो. जास्वंद केश्य म्हणून प्रसिद्धच आहे. जास्वंद सिद्ध तेल केसांना मालीश करण्याकरीता, नस्याकरीता वापरतात. केस गळणे, केस अकाली पांढरे होणे, चाई पडणे यावर जास्वंदाच्या फुलांचा लेप तेल खूप उपयुक्त आहे. प्रदरनाशक, रक्तस्तंभक ही वनस्पती प्रत्येक घरी नक्कीच असावी.
या व्यतिरिक्त २१पत्रींचे महत्त्व या दिवसात असते. गणपती स्थापनेच्या निमित्ताने या वनस्पतींची ओळख लहान मुलांना होते. म्हणूनच या वनस्पतींची कलमे आणून अंगणात लावणे हे खऱ्या अर्थाने निसर्ग संतुलनाकरीता मदत करेल.