जळगाव ः विशेष प्रतिनिधी
एका वेळी शहराच्या मध्यवर्ती व मुख्य बाजारपेठेत असलेल्या आणि प्रचंड गजबज असलेल्या शिवाजी रोडवरील हॉकर्सची अतिक्रमणे म्हणजे मोठी वाहतूक समस्या होती. या सानेगुरुजी चौक ते दाणा बाजारपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक व वर्दळ असतांना फळे,कटलरी समान,पाव-बिस्कीट,टोस्ट खारी आदी बेकरी उत्पादने,मसाला,किराणा,भांडी -पूजेचे समान आणि रेडिमेड कपडे अशी शेकडो दुकाने -हातगाड्या थाटली जात होती.
विशेष म्हणजे रस्त्याच्या अगदीच मधोमध डिव्हायडरवर गाड्या लागायच्या आणि त्यांच्या आजू बाजूला आणखी गाड्या लागत असत.रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अधिकृत दुकानदार व त्यांच्या दुचाक्या त्यांच्या दुकानासमोर लागत असत.परिणामी जाणार्या-येणार्या वाहन किंवा पायी चालणारांसाठी फक्त पाच ते सात फुटांचा रस्ता शिल्लक राहायचा.उल्लेखनीय म्हणजे वाहतुकीची ,पायी चालणार्या पादचार्यांना कितीही अडचण होवो, हॉकर्स -हातगाड्या अजिबात बाजूला सरकत नसत.भलेही वाहतुकीची कितीही कोंडी होवो,१० ते २० मिनिटांपर्यंत वाहतुकीचा खोळंबा होवो,हॉकर्सवाले एक इंच सुद्धा सरकत नसत.
अशा कारणावरून साने गुरुजी चौक ते दाणा बाजार चौकापर्यंत अनेकदा वाद-विवाद होत,कधी हाणामार्या सुद्धा व्हायच्या.मात्र हॉकर्सचे ते अतिक्रमण हटविणे एक दिव्यच होते.कारण जेव्हाही मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक त्या ठिकाणी हटावसाठी गेले असेल तेव्हा वादच झालेला दिसे.कधीकधी तर अतिक्रमण पथकातील लोकांना मारहाण करण्याच्या घटनाही येथे झाल्या असल्याने पालिका अतिक्रमण हटाव पथक शिवाजी रस्त्या-वरील अतिक्रमाणकडे ढुंकूनही पहात नसत.हटावच्या मोहिमेला कधी जातीय म्हटले जात असल्याने नुसते अतिक्रमण कर्मचारी तेथे गेलेही तर प्रचंड तणाव निर्माण झालाच म्हणून समजा.
अशा वादग्रस्त ठरलेल्या शिवाजीरोड वरील हॉकर्सच्या अवैध अतिक्रमणांना हटविण्याची कारवाई हाती घेतली तेव्हा हॉकर्स धारकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पण न्यायालयाने त्यांची बाजू फेटाळून लावताच महापालिकेच्या पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणि व्हिडीओ चित्रीकरण करीत तीन वर्षांपूर्वी शिवाजी रस्त्यावरील हॉकर्सचे अतिक्रमण साफ केले.इतकेच नाही तर रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या धुलिया सायकल,सत्यनारायण बुक डेपो ते बाहेती सायकलपर्यंत आणि दुसर्या बाजूने मामाजी रेस्टॉरंट ते चैतन्य मेडिकल व जितेंद्र मुंदडा यांच्या दुकानांचे ओटे,शेड.पायर्या सुद्धा तोडल्या.
तेंव्हा साने गुरुजी चौकापासून ते कोंबडी बाजार पर्यंतच्या शिवाजी रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता.शहरातील नागरिकांनी शिवाजी रोड मोकळा झाल्याने महापालिकेचे कौतुक केले.अतिक्रमण पथकाला धन्यवाद दिले.हा रस्ता व विशेष करून मधोमध पूर्णपणे मोकळा झाल्याने लोकांच्या दुचाक्या-चारचाकी गाड्या लावण्याची (पार्क)करण्याची चांगलीच सोय झाली होती.
मात्र आपल्या जळगावात प्रशासनाच्या कोणत्याच कामात सातत्य ,नियमितता व कठोर कारवाईचा प्रकार अवलंबविला जात नसल्याने व अतिक्रमण पथकातील काही लोक व काही अधिकारीही बरबटलेले असल्याने, शिवाजी रोड हॉकर्सच्या (फळगाड्या वैगैरे) अतिक्रमणाने पुन्हा गजबजून गेला आहे.सकाळी थोडा वेळ रस्ता मोकळा दिसतो मात्र दुपारनंतर साने गुरूजी चौक ते दाणा बाजार पर्यंत संपूर्ण रस्ता फळगाड्यावाले ताब्यात घेतात.जवळच दाणाबाजार आणि मुख्य बाजारपेठ असल्याने वाहतूक आणि वर्दळ या रस्त्यावर असतेच.पण या फळ विक्रेत्यांमुळे पुन्हा कोंडी व्हायला लागली आहे.
फळगाड्यावाले रस्त्याच्या मधोमध तर थांबतातच,त्यांच्या आजूबाजूलाही दुसर्या गाड्या बेशिस्तपणे लावल्या जात असतात.त्या गाड्यावाल्यांजवळ ग्राहकांची गर्दी म्हणजे रस्ता बंद अशी स्थिती निर्माण व्हायला लागली आहे.या परिस्थितीस अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जबाबदार असल्याचे शेजारचे दुकानदार सांगतात.अतिक्रमण विभाग ज्यांच्याकडे आहे ते उपायुक्त संतोष बाहुळे खरोखरीच अतिक्रमणधारकांसाठी कर्दनकाळ म्हटले जातात.त्यांची कारवाई निष्पक्ष असते.कोणत्याही अधिकारी,पदाधिकार्यांना ते जुमानीत नाहीत हेही खरेच आहे पण अतिक्रमण विभागाचे बरबटलेले कर्मचारी भ्रष्ट मार्ग अवलंबित असल्याने हॉकर्सवाल्यांचे फावत आहे.
महापालिका अतिक्रमण हटाव विभागाचे तेच-ते कर्मचारी म्हणजे हॉकर्स व अतिक्रमणधारकांशी त्यांचे साटेलोटे असल्याचे बोलले जाते.हेच कर्मचारी अतिक्रमणधारक हॉकर्सवाल्यांना सावध करतात, साहेब येणार आहेत, आज बाजूला बसा किंवा दुकान लावू नका असे संदेश कारवाईपूर्वी देतात (त्याचा मोबदलाही घेतात).ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही.
अतिक्रमण विभागातील कर्मचारी वर्षानुवर्षे तेच आहेत.परिणामी त्यांचे आणि अतिक्रमणधारकांचे सलोख्याचे संबंध स्थापित झाले आहे.त्यामुळे कर्मचारी त्यांचे हित संबंध जोपासण्याचे काम करतात.त्यांना भाजीवाल्याकडून भाजीपाला,फळवाल्यांकडून फळे तसेच त्या-त्या हॉकर्स वाल्यांकडून वस्तू अगदी फुकटात मिळवतात अशीही जोरदार चर्चा आहे.त्यामुळेच हा अतिक्रमण हटाव नव्हे तर अतिक्रमण संवर्धन विभाग म्हटला जातो आहे.आयुक्त ,उपायुक्त साहेबांनी याची दखल घ्यावीच आणि अतिक्रमण विभागाचे नूतनीकरण करावे अशी येथील पक्क्या दुकानदारांची मागणी आहे .