जळगाव, प्रतिनिधी । शिवाजीनगर हुडको भागात किरकोळ कारणावरून एका तरुणास बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचीही माहिती समोर आली आहे. २७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही घटना घडली.
गजानन विलास बाविस्कर (वय २७) हा तरुण मारहाणीत जखमी झाला आहे. तर मारहाण करणारी टोळी वाल्मीकनगर भागातील असल्याची माहिती आहे. गजानन याने शिवाजीनगर हुडको परिसरात चाकूचा धाक दाखवून दहशत पसरवली हाेती. सोमवारी दुपारी त्याचे एका जणाशी वाद झाले. यानंतर काही वेळातच वाल्मीकनगरातून एका चारचाकीतून तसेच पाच-सहा दुचाकीने काही तरुण हुडको परिसरात आले. त्यांना पाहून गजानन एक स्वच्छतागृहात लपून बसला होता. या तरुणांनी स्वच्छतागृह तोडून त्याला बाहेर काढले. यानंतर बेदम मारहाण केली.
यात त्याचे हात-पाय व डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांच्या म्हाेरक्याने पिस्तूलमधून एक गोळी हवेत चालवून दहशत परसवली, असे एका प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. गजानन याला मारहाण केल्याानंतर टोळी तेथून निघून गेली. तर जखमी गजानन याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाकडून पोलिसांना एमएलसी पाठवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे घटना दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय बळावला आहे. तर दुसरीकडे अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते आहे. दरम्यान, शहरात २० व २२ सप्टेंबर असे दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आधीच तणाव निर्माण झाला आहे. शिवाजीनगर हुडकोत घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस चौकशी करीत आहेत.
