जळगाव प्रतिनिधी | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कैलास पाटील यांचे आज ना. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश घेतला आहे.
माजी आमदार कैलासबापू पाटील यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीत तेव्हाचे विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांचा दणदणीत पराभव केला होता. एक जायंट किलर म्हणून त्यांचा राज्यभरात लौकीक झाला होता. यानंतर २००९ साली हा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे ते पुन्हा निवडणूक लढवू शकले नाहीत. यानंतर २०१४ च्या निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना निवडून आणण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. नंतर मात्र प्रा. सोनवणे आणि कैलासबापू यांच्यात दुरावा निर्माण झाला. पक्षविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.
कैलास पाटील हे हातावर घड्याळ बांधणार असल्याची चर्चा सुरू होती. यानुसार आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजीत मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ना. भुजबळ यांनी कैलास पाटील यांचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्या समर्थकांनीही राष्ट्रवादी प्रवेश केला. याप्रसंगी ना. छगन भुजबळ यांच्यासह माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, रोहिणीताई खडसे आदींसह अन्य नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.