जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या आपत्तीत जिल्हावासियांना आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा वेळीच उपलब्ध होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी शासन व प्रशासनाने लागू केलेले निर्बंध हे जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठीच आहेत. त्यामुळे त्याचे सर्व जिल्हावासियांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पालकमंत्री ना. पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रीमंडळ बैठकीत सहभागी झाले होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देऊन सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांसह जिल्ह्यात आवश्यक असलेल्या बाबींचा उहापोह केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाची कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांची ऑनलाईन उपस्थिती होती. बैठकीत पालकमंत्र्यांनी कोरोना रुग्णांवर योग्य उपचाराच्या व आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यात. तसेच रुग्णांना वेळेवर आवश्यक तेवढाच ऑक्सिजन पुरवठा करणेबाबत निर्देश दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी आगामी श्रीराम नवमी, हनुमान जयंती व महावीर जयंती हे उत्सव अतिशय साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन देखील पाटील यांनी जिल्हावासियांना केले.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने एन्ट्री केली. तेव्हापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहे. अद्यावत सुविधा स्टॉफ असल्याने याठिकाणी मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, वर्षभरात जीएमसीत ७ हजार १ रुग्ण दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यापैकी ६२४७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली तर रुग्णालयात ७५४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी संगितले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपाने शहरातील सर्वच गर्दीच्या ठिकाणांवर नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी टेस्टिंग सेंटरदेखील सुरू केले आहेत. याचा परिणाम म्हणजे टेस्टिंग वाढल्याने पालिकेकडील अँटिजेन किटचा साठा मंगळवारी संपण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे टेस्टिंग बंद पडण्याची भीती होती. यापूर्वीच १६ हजार किटची मागणी नोंदवण्यात आल्याने साठा संपण्यापूर्वी ४ तास आधीच ६ हजार किट प्राप्त झाले.