जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी ५ जानेवारी रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. २३८ लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिव्यांगांच्या तपासणीच्या कामकाजाची पाहणी केली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
ज्या दिव्यांग बांधवानी ५ जानेवारीचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तसेच ज्यांना परिवहन सेवेच्या (एसटी बस वगैरे) अडचणींमुळे मागील बुधवारी येता आले नाही अशा ३८ दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली. नेहमी दिसणारी गर्दी हि मर्यादित झाली. दर बुधवारी होणारी गर्दी आणि गैरसोय पाहता दिव्यांग मंडळाने सुरु केलेल्या आगाऊ बुकिंग कुपन प्रणालीला चांगला उदंड प्रतिसाद लाभला आहे.
उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे यांच्यासह तज्ज्ञ डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. पूर्वा मणेरीकर, डॉ. विनोद पवार, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. स्नेहा पल्लोड, डॉ. संतोष पोटे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी चेतन निकम, दत्तात्रय पवार, विशाल दळवी, आरती दुसाने, वाल्मिक घुले, प्रकाश पाटील, अजय जाधव यांनी सहकार्य केले.
उत्तम नियोजन, चोख व्यवस्थापन
“सकाळी दिव्यांग बांधवांची नेहमी होणारी गर्दी दिसली नाही. कुपन प्रणालीमुळे ज्यांना आजची ५ रोजीची तारीख मिळाली होती, त्यांनी कुपन दाखवून तपासणी केली. मागील वेळी ज्यांना एसटी बसमुळे येता आले नव्हते त्यांची देखील तपासणी करण्यात आली. कुपन प्रणाली यशस्वीरीत्या राबविली गेली, तसेच योग्य व्यवस्थापन केले म्हणून मंडळाच्या कार्यकारिणीसह कर्मचाऱ्यांचे कौतुक आहे.”
– अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.
प्रमाणपत्र मिळण्याबाबतची प्रक्रिया
दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून दिव्यांग मंडळातून बुकिंग कुपन घ्यावे. कूपनवर दिलेल्या तारखेला अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.