जळगाव, प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दि. २७ डिसेंबर २०२१ ते दि. १ जानेवारी २०२२ या कालावधीत व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात करून ध्येय निश्चित केले पाहिजे असे प्रतिपादन संस्थेचे प्राचार्य डॉ. पराग पाटील यांनी केले. व्यक्तिमत्व विकास या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेदरम्यान डॉ. पराग पाटील, प्राचार्य, डॉ. प्रशांत अरगडे, विभागप्रमुख औषधनिर्माणशास्त्र, डॉ. कुलदीप बन्सोड, शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड, डॉ. अमोल लांडगे, प्राचार्य, एसएसबीटी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, जळगाव, डॉ. दादासाहेब करंजुले, शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर, भालचंद्र हाबडे, नाशिक, डॉ. विवेक कहाले, डॉ. चैताली पवार, सुनील गायकवाड, राकेश दौडे आदी तज्ञ व्यक्तीने व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेले सॉफ्ट स्कीलवर विद्यार्थ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.
व्यक्तिमत्व विकास केंद्रासाठी अनुदान
येथील औषधनिर्माणशास्त्र विभागात कौशल्य व व्यक्तिमत्व विकास केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत अनुदानही प्राप्त झाले आहे. प्राप्त अनुदानातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूम तयार करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य व व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या समन्वयक डॉ. चैताली पवार यांनी दिली. कार्यशाळेकरिता औषधनिर्माणशास्त्र विभागातील रितापुरे व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.