मुंबई, प्रतिनिधी । मुंबईतील साकी नाका परिसरातील घटने बरोबरच राज्यातील अन्य भागातही महिलेंवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. अशात शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणे हे महत्वाचे असल्याचे मत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी मंत्रालयात काल राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.
राज्यात पोलिसांचा धाक कोणालाही राहिला नाही.17 वर्षाचा मुलगा गँगरेपमध्ये आरोपी होतो आणि तरीही त्याचा जामीन होतो अशात पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक राहणार तरी कसा त्यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी गृहमंत्री यांनी शक्ती कायदा हा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत करू तसेच महिलांच्या बाबतीत सरकार गंभीर असून या पुढे असे प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्याचे ही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्याचे त्यांंनी सांगितले.
अनेक प्रकरणात आरोपी हे परप्रांतीय असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने राजकारण होत आहे असा प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की,सध्या महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामध्ये अधिक आरोपी परप्रांतीय आहेत त्यामुळे या येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवणे गरजेचे आहे ही मागणी राज ठाकरे यांनी केली होती मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली मात्र काही लोकांना त्यांची वोट बँकेची काळजी वाटत आहे मात्र राज ठाकरे हे फक्त महाराष्ट्राच्या हिताचे बोलतात असे ही शालिनी ठाकरे यांनी यावेळी सांगितले.