जळगाव ः प्रतिनिधी
केशकर्तनालय (सलून्स),स्पा सेंटर्स आणि जिम वगळता सर्व व्यापारी व्यवहार शहरासह जिल्ह्यात आजपासून सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुले करण्यात आल्यामुळे व्यापारी,व्यावसायिक व नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. शहरातील व्यापारी संकुलांनाही परवानगी मिळाल्याने मुख्य बाजारपेठेतील फुले मार्केट,सेंट्रल फुले मार्केट व गोलाणी संकुलासह अन्य संकुलातील दुकाने सुरु करण्याची लगबग दिसून आली. त्यामुळे व्यापारी व व्यावसायिकांमध्ये उत्साह दिसून आला.
ब्रेक द चेन अंतर्गंत गेल्या ५६ दिवसापासून अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती.त्यामुळे व्यावसायिकांची आर्थिंक कोंडी होत होती.आजपासून काही सवलती मिळाल्यामुळे त्यांना काहिसा दिलासा मिळणार आहे.
अत्यावश्यक सेवासंबंधित दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील तर कृषि संबंधित सेवा पुरवणारी दुकाने सकाळी सात ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवायलाही परवानगी मिळाली आहे. ही आणि अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व व्यापारी केंद्रे शनिवार आणि रविवारी मात्र पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉक, सायकलिंग, खुल्या मैदानातील व्यायाम यांनाही परवानगी देण्यात आली असून त्यासाठी पहाटे चार वाजेपासून सकाळी आठवाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे.
व्यापार,व्यवसायासाठी पाच तास खुले करण्यात आले असले तरी सर्व व्यापारी आणि कार्यालयीन अस्थापनांतील कर्मचार्यांना (४५ वयावरील) लसीकरण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांना दर आठवड्याला आरटीपीसीआर चाचणी करणेही आवश्यक आहे. या शिवाय, दुकानांच्या दर्शनी भागात बँक काऊंटर प्रमाणे काच किंवा प्लास्टिकचे पारदर्शक शीट अथवा पडदा (आंतरपाट) लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय, दुकानाच्या या काऊंटरवर पाचपेक्षा जास्त ग्राहक एकावेळी असणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागेल. केशकर्तनालय (सलून्स), स्पा सेंटर्स आणि जिम वगळता सर्व व्यापारी व्यवहार आजपासून सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुले करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शहरातील व्यापारी संकुलांनाही परवानगी मिळाली आहे. कृषी आणि अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व व्यापारी केंद्रे शनिवार आणि रविवारी मात्र पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉक, सायकलिंग, खुल्या मैदानातील व्यायाम यांनाही परवानगी देण्यात आली असून त्यासाठी पहाटे चार वाजेपासून सकाळी आठवाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे.
दोन महिन्यांपासून ठप्प झालेल्या जळगावच्या अर्थचक्राला काही प्रमाणात गती देणारा हा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी जारी केला आहे.नियमांचे उल्लंघन केल्यास रु. १० हजार दंड, दुसर्यांदा केल्यास दुकानाला सील लावण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
तर पुन्हा निर्बंध लादणार
भविष्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्के किंवा अधिक झाल्यास आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता ४० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास निर्बंधांबाबत सुधारित आदेश काढण्यात येईल, असेही जिल्हाधिकार्यांनी आदेशात नमूद केले आहे.त्यामुळे व्यावसायिकांनी व नागरिकांनीही कर्तव्यभावनेतून निर्बंधांचे पालन केले पाहिजे.
अशा आहेत सवलती
अत्यावश्यक वस्तू व सेवांसाठी दुकानातून विक्री व सेवा देण्यासाठी सकाळी ७ ते दुपारी दोन वाजेपर्यंत (सातही दिवस सुरू ठेवता येईल) घरपोच वस्तू व सेवा देण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत.