जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनाचे संकट गडद होत असल्यामुळे शहरासह जिल्ह्यात जिल्हा प्रशासनातर्फे लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून २८ ते ३० मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.या दरम्यान अत्यावश्यक सेवा व वृत्तपत्र वितरणला सुट देण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश असतांनाही जळगाव शहरात काही वृत्तपत्र वितरकांना पोलीस नाहक त्रास देत असल्याच्या घटना घडत असून त्याबद्दल वृत्तपत्रसृष्टीत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या २८ मार्च रोजी जुने बस स्टॅड,रेल्वे स्टेशन व नविन बस स्थानक परिसरातील वृत्तपत्र वितरण स्टॉलधारकांना पोलिसांनी दमदाटी करुन स्टॉल बंद करण्यास भाग पाडले. याबद्दल एका पोलीस अधिकार्यांकडे भ्रमणध्वनीव्दारे तक्रारही करण्यात आली असून यापुढील काळात वृत्तपत्र वितरकांना पोलिसांकडून त्रास दिला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षकांनी संबंधितांना तसे सुचित करावे असे आवाहन करण्यात आले आहे.