चोपडा : प्रतिनिधी
सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन जाहीर करुन परमीट रुम व वॉईन शॉप विक्री केंद्रे बंद ठेवावी, असे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार चोपडा शहरात सर्व दारुची दुकाने बंद आहेत. मात्र, हे बंद असल्यामुळे अवैध दारुविक्रीला ऊत आला असून शहरातील बंद वाईनशॉपच्या बाहेर खुलेआम अवैध दारु विक्री होत आहे. म्हणून प्रशासनाने अवैध दारु व गुटखा विक्री करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी उत्पादन शुल्काच्या अधिकार्यांना दिले.
शहरातील वाईन शॉप आणि रितसर परवाना धारक जे आहेत, त्यांनी आदेश स्विकारून आपली मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवली आहेत. पण त्याचाच फायदा घेत चोपडा येथे अवैध मद्य विक्री करणारे प्रत्येक चौकात खुलेआम सकाळ पासून ते रात्रिपर्यंत अवैध दारु विक्री करताना दिसत आहेत आणि मद्यप्रेमी गर्दी करून तेथेच दारू रिचवत असल्याचे चित्र दिसत आहे. ज्यावेळेस शहरात ड्राय-डे असतो, तेव्हा हे लोक शासनाचा आदेश झुगारुन खुलेआम दारू विकतात. यावर उत्पादन शुल्क आणि पोलिस अधिकार्यांनी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी पत्रकार मिलींद सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
शहरातील प्रत्येक चौकात अवैध दारू व गुटखा विक्री होतेय ती थांबली पाहिजे.
काही लोक तर दारू आणि गुटखा घेण्यासाठीच संचारबंदी तोडून बाहेर निघत आहेत. प्रत्येक रस्त्यावरील व चौकातील पानटपर्या सुरु आहेत. त्यांच्यामार्फतच अवैध गुटखा विक्री होते. तरी प्रशासनाने अवैध दारु व गुटखा विक्री करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार मिलींद सोनवणे यांनी केली आहे.
एकीकडे संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये आपले सर्वस्व पणाला लावून काम करताय. पण त्याचा फायदा अवैध व्यवसाय करणारे काही गुंडप्रवृत्तीचे माफिया उचलत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांकडे पत्राद्वारे पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी तक्रार केली आहे.