जळगाव, प्रतिनिधी । चाळीसगावसह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अनेक गावांतील लोकांचे संसार वाहून गेल्याने ते अक्षरशः रस्त्यावर आले. डोक्यावर छप्पर राहीले नाही. त्यामुळे अशा गरजू लोकांना जोपासण्यासाठी जळगावातील सेवा धर्म परिवारासह लायन्स क्लब, नारी शक्ती ग्रुप, कला सिद्धी फाउंडेशन, झाशीची राणी बचत गट आदी संस्था, संघटनांनी मदतीचा हात दिला आहे.
चाळीसगावसह तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांमुळे उघड्यावर पडलेला संसार सावरण्यासाठी या सामाजिक संस्थांतर्फे ही मदत करण्यात आली. यात सामाजिक कार्यकर्त्या बेबी खोडपे, रमेशकुमार मुणोत, भारती रंधे, भारती कुमावत, सुमित्रा पाटील यांनी दिलेल्या मदतीच्या आधारे मोठ्या प्रमाणात कपडे, धान्य, किराणा आणि औषधांचे किट आपत्तीग्रस्त कुटुंबांना वाटप करण्यात आले. मदतीच्या वस्तू असलेल्या या मदत रथाला (वाहनाला) आदर्शनगरातील लायन्स हॉल येथून महापौर जयश्री महाजन यांनी हिरवी झेंडा दाखवली.
या वेळी सेवा धर्म परिवाराचे अध्यक्ष चंद्रशेखर नेवे, नारी शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा पाटील, कला सिद्धी फाउंडेशनच्या आरती शिंपी, सुमित्रा पाटील, रेणुका हिंगू, आरती व्यास, सुश्मिता भालेराव, बेबी खोडपे, भारती कुमावत, भारती रंधे, रमेशकुमार मुणोत, राजेश खोडपे, अमेय शिंपी, सागर चव्हाणे, रवींद्र चव्हाण, अजय भालेराव, संजय साळुंखे, कोमल साळुंखे, सुनीता पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष किरण गांधी, सचिव रोहित अग्रवाल, रामनारायण वर्मा, रिजन चेअरमन रवींद्र गांधी, झोन चेअरमन जयेश ललवाणी आदी उपस्थित होते.
नॅशनल यूथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात भारतीय युवा परिषदेच्या शहराध्यक्षपदी सौरभ हिरालाल जैन यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. जैन यांची सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामू यांच्या मार्गदर्शनात व उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल वाकलकर व जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर यांच्या शिफारशीनुसार राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. त्रेणीकुमार कोरे यांनी ही निवड केली. या निवडीबद्दल पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
भगीरथ इंग्लिश स्कूलचे आदर्श शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. याबाबत त्यांना पत्र प्राप्त झाले असून शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, ज्येष्ठ कला शिक्षक एस. डी. भिरूड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल किरण पाटील यांचे काैतुक केले अाहे.
पूरग्रस्त भागात स्वयंसेवकांनी केले मदतकार्य
चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी पिंपरखेड या भागात आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन शिबिर लावले.चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने याचे नेतृत्व केले. पिंपरखेड गावाचा तालुक्याशी संपर्क असलेला मुख्य पूल पूराच्या पाण्याने वाहून गेला होता. त्याच्या संपूर्ण भरावाचे काम स्वयंसेवकांनी श्रमदानाने पूर्ण केले. चाळीसगाव बायपास ते वालझेरी हा चार किलो मीटरचा रस्ता पुराचे पाणी दोन्ही बाजूच्या नालीत काटेरी झुडुपांमुळे अडकल्याने संपूर्ण पाणी मुख्य रस्त्यावर अडकून पडले होते. त्यामुळे नागरिकांना चाळीसगाव, वालझेरी, पिंपरखेड, पिंपरखेड तांडा, चंडिकावाडी व पाटणा गाव असा प्रवास करता येत नव्हता. नागरिकांची ही गैरसोय स्वयंसेवकांनी नाल्यांमध्ये अडकलेला गाळ व काटेरी झुडपे श्रमदानातून काढले. स्वयंसेवकांनी श्रमदानातून शाळेत साचलेला गाळ, काटेरी झुडुपे, लाकडाची ओंडकी दूर केली व परिसर स्वच्छ केला. रासेयोचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, प्राचार्य डॉ. एस. आर जाधव, डॉ. अरविंद सूर्यवंशी, डॉ. राजू निकम, प्रा. डॉ. प्रशांत कसबे यांनी श्रमदान करुन स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. प्रा. मंगला सूर्यवंशी, प्रा. एच. आर. निकम, प्रा. के. पी. रामेश्वरकर, रावसाहेब त्रिभुवन, कैलास चौधरी, ई. एच .गायकवाड, आकाश धनगर, विलास पाटील, सागर कोळी, प्रफुल्ल मेढे, परिक्षित तायडे यांनी नियोजन केले.
रोटरीच्या सात क्लबतर्फे मदत : रोटरीच्या सात क्लबतर्फे पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ चाळीसगावकडे ९७३०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. डिस्ट्रिक्ट सहसचिव समकिंत छाजेड, संदीप देशमुख यांना रोटरी स्टार्सचे संस्थापक अध्यक्ष सागर मुंदडा, डॉ. तुषार फिरके, मिडटाऊनचे किशोर सूर्यवंशी, हर्षल पाटील, चंदन जाखेटे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. या उपक्रमासाठी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष संदीप शर्मा, मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. विवेक वडजीकर, ईस्टचे अध्यक्ष विरेंद्र छाजेर, गोल्डसिटीचे अध्यक्ष उमंग मेहता, स्टार्सचे अध्यक्ष नीरज अग्रवाल, इलाइटचे अध्यक्ष नितीन इंगळे, रॉयल्सचे अध्यक्ष स्वप्निल जाखेटे, लक्ष्मीकांत मणियार यांनी सहकार्य केले.
सेवा धर्म परिवाराने पूरग्रस्तांसाठी दिलेली मदत घेऊन जाणाऱ्या वाहनाला झेंडी दाखवताना महापौर जयश्री महाजन येथे वाटप झाली मदत : मदतीच्या ट्रक चाळीसगाव, रोकडे, बोराडे खुर्द, पातोंडा या गावांमधील नुकसानग्रस्त गरीब वस्तीत प्रत्यक्ष जाऊन गरजू लोकांना वाटप करण्यात आले. ही सर्व मदत प्रांताधिकारी लक्ष्मीकांत रातालकर, तहसीलदार अनिल मोरे यांच्या उपस्थितीत सामाजिक संस्थांमार्फत वाटप करण्यात आली.