शहरातील चौपदरी मार्ग नियमबाह्य व बेकायदेशीर होत असल्याबाबत तक्रार दाखल

0
64

जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील चौपदरी मार्ग नियमबाह्य व बेकायदेशीर होत असल्याबाबत जिल्हा मऩियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी पोलिस तक्रार दाखल केली असून रस्ता सुरक्षा सप्ताहात अपघात झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदाराविरुध्द रितसर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, शहरातून जात असलेल्या चौपदरी मार्गाबाबत अजिंठा चौक ते इच्छादेवी या दरम्यान होत असलेल्या अपघाताबाबत व त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्लीच्या मुख्य कार्यालयाच्या २७ जुलै २०१८च्या तपासणी अहवालाप्रमाणे काम होत नाही. यात स्थानिक गरजा, जागेवरील आवश्यकता,सुरक्षा, सर्विस रोड,अस्तित्वात असलेल्या रोड ड्रेनेज,रुंदी करून आवश्यक सेवा, अंडरपास व फुटवेअर ब्रिजचा समावेश असावा तसेच अस्तित्वातील असलेल्या ६० मीटर रुंदीचा महामार्ग पूर्णपणे विकसित करावा. त्यात प्रामुख्याने दुभाजकासह दोन्ही बाजूला साडेसात मीटरचे रस्ते तयार करून (चौपदरी), दोन्ही बाजूला साडेपाच मीटरचे सर्व्हिस रोड व दोन्ही बाजूस फूटपाथ आवश्यक आहे तसेच जेथे उड्डाणपूल, चौक सुधारणा, पादचार्‍यांसाठी व वाहनांसाठी अंडरपास तयार केले जावे. अजिंठा चौक, इच्छा देवी चौक यांना विशिष्ट पद्धतीने तयार करण्याचे लेखी आदेश देऊनसुद्धा जळगाव राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रबंध संचालक चंद्रकांत सिन्हा हे त्या आदेशाचे उल्लंघन करीत आहे.
सुरक्षा उपाय योजनांचा अभाव
सध्या सुरु असलेल्या महामार्गावर कोणत्याही प्रकारची रोड सेफ्टीचा वापर केला जात नाही त्यात प्रामुख्याने रिफ्लेक्टर , साईन बोर्ड , ड्रायव्हरटेशन बोर्ड, रोड साईन, डेलीनेटर्स, बॅरिगेट कोनस, पायलोमस लाईट,वार्निंग साईन, इन्फॉर्मेशन बोर्ड यांचासुद्धा समावेश नाही.
डिव्हाईडरचे अनोखे काम
डिव्हायडरचे जे काम झालेले आहे किंवा चालू आहे त्यात माती टाकून त्यावरती पीसीसी करण्यात येत आहे.सदर बाब प्रोविजनमध्ये आहे काय? नसल्यास अशाप्रकारे काम करता येते का? असे प्रश्न फारुक शेख यांनी उपस्थित केले आहेत.
स्पीड ब्रेकरही चुकीचे ठिकाणी
महामार्गावर स्पीडब्रेकर बाबत मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड हायवे यांचे ११एप्रिल २०१६ च्या पत्राची सुद्धा खुलेआम अवहेलना केली जात आहे.ज्या ठिकाणी अपघात होत आहे तिथे आवश्यक ती कारवाई न करता अजिंठा चौकात हायवे वरच दोन ठिकाणी ब्रेकर लावले तेदेखील नियम बाह्य? असे नमूद केले आहे.
पोलीस तक्रार सादर
येथील मनीयार बिरादरीचे अध्यक्ष तथा विविध सामाजिक संघटना व क्रीडा संघटनांमध्ये कार्यरत असलेले फारूक शेख यांनी सदर प्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३९ प्रमाणे विवक्षित अपराधाची वर्दी जिल्हा दंडाधिकारी जळगाव ,पोलीस अधीक्षक जळगाव, तथा पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव यांना प्रत्यक्ष भेटून दिलेली आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान कायदा कलम १६६, २६८, ३०४ अ, याप्रमाणे कारवाई करण्याची विनंती केली आहे.
या तक्रारीच्या प्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी, ना.नितीन गडकरी, चेअरमन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,दिल्ली, मुख्य दक्षता अधिकारी राजमार्ग प्राधिकरण दिल्ली व जळगावचे प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत सिंह यांना सुद्धा दिेली आहे.
अपघात घडल्यास गुन्हा दाखल करा
येणार्‍या सुरक्षा वाहतूक सप्ताहात ईश्वरकृपेने जीवित हानी होऊ नये म्हणून सदर तक्रार दाखल केलेली आहे त्यावरही आवश्यक ती कारवाई न केल्यास अपघात घडल्यास जळगाव विभागाचे राष्ट्रीय राजमार्ग परिवहन प्राधिकरणाचे प्रबंध संचालक चंद्रकांत सिन्हा व ठेकेदार कंपनी झेंडू कन्स्ट्रक्शन यांच्याविरोधात तक्रार नोंदवावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी फारुक शेख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here