जळगाव : प्रतिनिधी
शहरातील अजिंठा रोडवरील सुरभी लॉन जवळून सुप्रिम कॉलनीत राहणार्या चालकाची दीड लाख रूपये किंमतीची मालवाहू गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चालकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूध्द रितसर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मनोहर ज्ञानदेव पवार (वय ३८) रा. त्रिमूर्ती नगर, सुप्रिम कॉलनी हे खासगी मालवाहू गाडीचे चालक आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे मालवाहू (एमएच १९- बीएम ०२४४) क्रमांकाची चारचाकी गाडी आहे. मिळेल ते भाड्याने माल वाहण्याचे काम ते करतात.
९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील अजिंठा चौफुलीजवळील सुरभी लॉनजवळ त्यांनी मालवाहू गाडी पार्किंगला लावली व कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ते परत आले असता त्यांना मालवाहू गाडी दिसून आली नाही. संपूर्ण परिसर शोधूनही वाहन मिळाले नाही.
चालक मनोहर पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी हे करीत आहे.