मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील हलखेडा येथे औषधीला वापरात येणारी काळी हळद देतो असे म्हणत एका व्यापार्याची ८६ हजाराची फसवणूक केली. तसेच त्यास मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याबाबत मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुर्हा येथील शुभम संजय पाटील याने औषधीसाठी लागणारी काळी हळद देतो असे सांगत गुजरातमधील व्यापारी साकीर अमहद हासीन आमलीवाला (वय ४५, रा. वालाड, जि.वापी) यास गुगल पे वरुन ८६ हजार ३०० रुपये मागवून घेतले होते. साकीर याने औषधीची हळद का दिली नाही म्हणून जाब विचारला असता शुभम पाटील हा टाळाटाळ करीत होता. शेवटी साकीर यांनी पाटील यास पैसे परत मागण्याचा तगादा लावला. पैसे घेण्यासाठी साकीर हा मुक्ताईनगर तालुक्यात आला असता शुभम पाटील व त्याच्यासोबत असणार्या १० ते १२ जाणांनी व्यापारी साकीर यास बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्थानकात साकीर आमलीवाला यांच्या फिर्यादीवरुन शुभम पाटील याच्यासह १० ते १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि साळुंखे करीत आहेत.