Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पातून ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ची पुन्हा प्रचिती
    मुंबई

    वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पातून ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ची पुन्हा प्रचिती

    saimat teamBy saimat teamJanuary 18, 2022No Comments6 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    • वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका

     

    मुंबई: कोविड विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायू पुरवठा करताना झालेली दमछाक पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने थेट स्वतःचेच वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारले. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिकता असणाऱ्या ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ ची यातून पुन्हा प्रचिती आली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने, एम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय वायुरुप प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट) उभारण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथेही वैद्यकीय द्रवरुप प्राणवायू ड्युरा सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (दिनांक १७ जानेवारी २०२२) झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

    कोविडसंसर्ग स्थितीमुळे ऑनलाईन स्वरुपात आयोजित या समारंभास मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहूल शेवाळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, बीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) एन. चंद्रशेखर, जी दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, एम पश्चिम विभागातील नगरसेवक   श्रीकांत शेटये, नगरसेवक अनिल पाटणकर, नगरसेविका श्रीमती अंजली नाईक, तसेच महानगरपालिका उपआयुक्त (मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण) श्री. रमाकांत बिरादार, उप आयुक्त (परिमंडळ ५) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त सर्वश्री. विश्वास मोटे, शरद उघडे, पृथ्वीराज चौहाण, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) श्री. कृष्णा पेरेकर, संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

    पालकमंत्री आदित्य ठाकरे याप्रसंगी संबोधित करताना म्हणाले की, कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत इतर शहरे आणि राज्यातूनही वैद्यकीय प्राणवायू आणून मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे प्राण वाचवले. एका रात्री तर युद्धसदृश्य परिस्थिती हाताळून दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुरक्षितपणे हलवावे लागले, इतकी प्राणवायूची कमतरता आपण अनुभवली. अशी स्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून महानगरपालिकेने तेव्हाच स्वतःचे वैद्यकीय प्राणवायू साठवण व सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. आज या प्रकल्पांच्या लोकार्पणातून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून अशाप्रकारचे प्रकल्प असणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोंद झाली आहे. कोविड विषाणूचे डेल्टा व ओमायक्रॉन हे दोन्ही उपप्रकार अद्याप फैलावत असून सर्वांनी मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर यासारख्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी अखेरीस केले. दोन्ही प्रकल्पांची वेगाने उभारणी केल्याबद्दल श्री. ठाकरे यांनी महापौर, सर्व लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व बीपीसीएल यांचेही कौतुक केले.

    मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर संबोधित करताना म्हणाल्या की, माहूल व महालक्ष्मी येथील ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट हे जणू संजीवनी प्रकल्प आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई व महाराष्ट्राबाहेर प्राणवायू पुरवठ्याअभावी रुग्णांना यातना सहन कराव्या लागल्या, मात्र त्याही स्थितीत मुंबईने योग्य दक्षता व नियोजन याआधारे रुग्णांचे प्राण वाचवले. आता ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांटमुळे पैसा आणि वेळही वाचणार आहे. ही सर्व कामगिरी इतर शहर व राज्यांनाही दिशा देणारी आहे. आपल्या प्रकल्पांमधून वेळप्रसंगी इतरांनाही मदत करता येईल. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कामगिरीची देशपातळीवर वाखाणणी केली जाते, असे सांगून मुंबईकरांनी कोविड प्रतिबंधक निर्देशांचे पालन करावे आणि प्राणवायू पुरवठ्याची चिंता करु नये, असेही महापौरांनी नमूद केले.

    खासदार अरविंद सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, या दोन्ही प्रकल्पांतून वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध होणार असल्याने कोविड इतर (नॉन कोविड) प्राणवायूची बचत होईल आणि आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. महापौर व महानगरपालिका आयुक्तांची टीम ही सर्वोत्कृष्ट कार्य करीत आहे. प्रत्येक निर्णय घेताना दूरदृष्टीने कामकाज केले जात असून मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री महोदय देखील त्यावर लक्ष केंद्रीत करत असतात, असा उल्लेखही श्री. सावंत यांनी केला.

    खासदार राहूल शेवाळे मनोगतात म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई महानगरपालिका अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देते. कोविड व्यवस्थापनामध्ये धारावी मॉडेल पाठोपाठ ऑक्सिजन मॉडेलच्या माध्यमातून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करण्याचे कामकाज महानगरपालिकेने केले आहे. ही कामगिरी कौतुकास्पद आहे. माझ्या मतदारसंघातील बीपीसीएल, आरसीएफ, एचपीसीएल, इंडियन ऑईल अशा सर्वच कंपन्यांनी कोविड व्यवस्थापन व प्राणवायू पुरवठ्यासाठी मोठी मदत केली आहे, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेखही श्री. शेवाळे यांनी केला.

    महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल याप्रसंगी म्हणाले की, कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रसंगी, महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आपण ‘वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू निर्मिती’ करणारे प्रकल्प (पीएसए प्लांट) उभारले. मुंबईत सध्या १८६ कोविड रुग्णालये असून आपत्कालीन प्रसंगी एका रुग्णालयातून इतर रुग्णालयांना प्राणवायू मदत पाठविण्यासाठी विविध मर्यादा येतात. माहूल व महालक्ष्मी येथील प्राणवायू प्रकल्पांमध्ये साठवण व पुनर्भरण अशा दोन्ही सुविधा आहेत. त्यामुळे मुंबईतील १८६ रुग्णालयांमध्ये कधीही, कोठेही प्राणवायू पोहोचविण्यास मोठा हातभार लागणार आहे. कोविडची साथ शिखरावर असताना दिवसाला २०० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्सची गरज भासत होती. आता एकट्या महालक्ष्मी प्रकल्पामधूनच १०० ते १२० ड्युरा सिलेंडर भरणे शक्य होणार आहे, यातून महानगरपालिकेने साध्य केलेली क्षमता सिद्ध होते, असे डॉ. चहल यांनी नमूद केले.

    अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी संगणकीय सादरीकरणासह प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू पुरवठा समस्येवर योग्य नियोजनाने आपण मात केली. असे असले तरी त्यातून बोध घेत ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट उभारले आहेत. त्यामुळे वैद्यकीय प्राणवायूचा साठा करण्यासह ऑक्सिजन सिलेंडर्सचे योग्य वितरण करणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिवसरात्र धावपळ करुन आवश्यक सर्व परवानग्या मिळवल्या, अवघ्या ३ ते ४ महिने कालावधीत प्रकल्प उभारले, माहूलमधील कामांसाठी बीपीसीएलचे देखील अतिशय मोलाचे सहकार्य मिळाले, याचा उल्लेख करीत महापौर, सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या योग्य समन्वयातून हे घडून आले, असेही श्री. वेलरासू यांनी नमूद केले.

    बीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) श्री. एन. चंद्रशेखर यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. श्रीमती स्मिता गवाणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

    000

    अ) माहूल स्थित वायूरुप वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्पाविषयीः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वायूरुप वैद्यकीय प्राणवायू जंबो सिलेंडर पुनर्भरण (Medical Grade Oxygen Cylinder Bottling Facility) प्रकल्प उभारला आहे. सुमारे ८५० चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर हा प्रकल्प साकारला आहे. येथे एकूण ३ तीन कॉम्प्रेसर लावण्यात आले आहेत. यामध्ये महानगरपालिकेने २ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, ४ मॅनिफोल्ड स्कीड इत्यादी यंत्रणा खरेदी केली आहे. बीपीसीएल मुंबई रिफायनरीने या प्रकल्पासाठी हातभार म्हणून सार्वजनिक उत्तरदायित्व स्वरुपात संयंत्रे उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये १ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, ४ मॅनिफोल्ड स्कीड इत्यादी संयंत्रांचा समावेश आहे. त्यासोबत, बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पापासून महानगरपालिकेच्या जंबो सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पापर्यंत दीड किलोमीटर लांबीची प्राणवायू वाहिनीदेखील बीपीसीएलने टाकली आहे.

    बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या माहूलमधील वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पामध्ये प्रतिदिन सुमारे ७२ मेट्रिक टन वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती होते. पैकी प्रतिदिन सुमारे १० ते १५ मेट्रिक टन इतका वायूरुप वैद्यकीय प्राणवायू महानगरपालिकेच्या माहूलमधील सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. या पुनर्भरण प्रकल्पामध्ये ७.१ घनमीटर क्षमतेचे सुमारे ११२ सिलेंडर एका तासात भरता येतात. या हिशेबाने ८ तासांच्या एका सत्रामध्ये सुमारे ८०० जंबो सिलेंडर भरता येऊ शकतात. २४ तासांच्या तीन सत्रात मिळून, १५ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध झाल्यास त्यातून किमान १ हजार ५०० जंबो सिलेंडर भरले जावू शकतात. प्राणवायूच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची तरतूद देखील करण्यात आली आहे. पुनर्भरण केलेले सिलेंडर्स रुग्णालयांपर्यंत वाहून नेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्वतःची वाहतूक व्यवस्था देखील उभी केली आहे.

    ब) महालक्ष्मी रेसकोर्स स्थित द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू ड्युरा सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्पाविषयी : महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू ड्युरा सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे १३ हजार लीटर द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवता येईल, इतकी मोठी टाकी आहे. या प्रकल्पामध्ये एकाचवेळी प्रत्येकी २१० लीटर क्षमतेचे १० सिलेंडर्स भरता येवू शकतात. या प्रकल्पाची दररोज १०० ते १२० सिलेंडर भरण्याची क्षमता आहे. त्याच्या प्रचालनासाठी प्रशिक्षित व अनुभवी कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. तसेच, सिलेंडर्स वाहतुकीसाठी २ विशेष परावर्तित वाहनेदेखील नेमण्यात आली आहेत. वापरात असलेल्या वाहनांमध्येच आवश्यक ते बदल करुन ती उपलब्ध करण्यात आल्याने, नवीन वाहने खरेदीचा खर्च वाचला आहे, हेही महत्त्वाचे आहे. एकूणच, या प्रकल्पाच्या उभारणीमुळे ड्युरा सिलेंडर पुनर्भरणाचा खर्च सुमारे ३५ ते ४० टक्के कमी झाला असून यातून महानगरपालिकेची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Mumbai : “महिलांचे राज्य! महाराष्ट्रातील १५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर

    January 22, 2026

    Mumbai : महापालिका निवडणूक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षण; गट एकत्र येण्याची शक्यता

    January 17, 2026

    Mumbai : ४६ पैकी ४६”चा पराक्रम आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांची शाबासकी,

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.