जळगाव : प्रतिनिधी
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या कामकाजासंदर्भात जयवंत भोईटे हे संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराच्या कामाबाबत वैचारीक व कायदेशीर लढाई लढत आहे. या लढ्यात ते न्यायी लढाई लढत असून संस्थेतील मानद सचिव निलेश भोईटे यांच्या गैर कारभाराबाबत नियमीत आवाज उठवतात. त्यामुळे निलेश भोईटे व त्यांच्या हस्तकांकडून जयवंत भोईटे यांना वारंवार धमक्या देण्यात येत होत्या. मात्र काल रात्री या घटनेचा कडेलोट झाला व निलेश भोईटे यांनी त्यांच्या हस्तकांसह जयवंत भोईटे यांच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, याबाबत जयवंत भोईटे यांच्याकडून पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी दिल्यानंतरही दखल न घेतली गेल्याने आज हा प्रकार झाला. एखाद्याचा बळी जाण्याची पोलीस प्रशासन वाट बघतेय का? असा सवाल जयवंत भोईटे यांनी ‘साईमत’शी बोलतांना केला आहे.
याबाबत माहिती जयवंत भोईटे यांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील मुक्ताईनगरमधील विठ्ठल पार्क मध्ये प्लॉट नं.१९ व गट नं. ७४ मध्ये जयवंत बाबुराव भोईटे हे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक आहेत. तर संस्थेचे मानद सचिव म्हणून निलेश भोईटे हे आहेत. निलेश भोईटे यांनी केलेल्या गैरकारभाराबाबत जयवंत भोईटे यांनी उच्च न्यायालयात तसेच शासनाच्या विभागांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे निलेश भोईटे व त्यांचे हस्तक यांच्याकडून जयवंत भोईटे यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जायच्या. याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत. काल रात्रीच्या सुमारास निलेश भोईटे व कल्पेश भोईटे यांच्यासह दोघांनी मध्यरात्री १.४५ वाजेच्या सुमारास जयवंत यांच्या घरावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी त्यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यातील दोन ते तीन दगड महिलांना व लहान मुलांना चाटून गेले. यात ते सुदैवाने बचावले. यानंतर कल्पेश भोईटे याने कंपाऊंडमध्ये घुसत खिडकीतून अश्लिल शिवीगाळ करत धमकी दिली. ‘‘निलेश भाऊंच्या विरोधात आडवा येतो का? जया हा फक्त ट्रेलर असून आठवडाभरात निलेशभाऊ तुला व तुझ्या परिवाराला जीवंत ठेवणार नाही, जया बाहेर निघ, तुला आत्ताच संपवतो’’ अशी धमकी दिली. मात्र आजुबाजूचे लोक वेळीच बाहेर आल्याने कल्पेश व त्याच्यासोबत आलेले दोघे पळून गेले.
या घटनेची तक्रार देण्यासाठी जयवंत भोईटे हे जळगाव तालुका पोलीस स्थानकात गेले असता तेथील ठाणे अंमलदार तायडे यांनी सदर अदखलपात्र तक्रार नोंदवून घेतली. दरम्यान, जयवंत भोईटे यांच्या म्हणण्यानुसार निलेश भोईटे व कल्पेश भोईटे यांच्यासोबत आलेल्या गुंडाचा उद्देश मला संपविण्याचा होता. याबाबत एक वर्ष झाले वारंवार पोलीस प्रशासनाकडे तक्रारी अर्ज देवूनही पोलीस प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. यावेळी आमच्या परिवारातील महिला व लहान मुले प्रचंड दहशतीत असून आमच्या जीवीतास धोका निर्माण झालेला आहे. सदर मंडळी ही गुन्हेगारी वृत्तीची असून वारंवार जीवे ठार मारण्याची धमकी देत असतात. याबात पोलीस प्रशासनाच्या वरीष्ठ अधिकार्यांनी दखल घेवून आम्हाला संरक्षण देवून गुन्हेगारी वृत्तीस आळा आणावा, अशी मागणी जयवंत भोईटे व त्यांच्या परिवाराने केली आहे.