जळगाव : प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षण हे सामाजिक सेवेच्या दृष्टीने महत्वाचे शिक्षण आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बोलावे. संवाद वाढवावा. मैत्रीपूर्ण सलोखा जोपासावा. तसेच, शिस्त व नियोजनबद्ध शिक्षण घेण्यासाठी कार्यरत राहावे, असा सल्ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व अधिष्ठाता संदेश (डिन्स ऍड्रेस) सोमवारी १ फेब्रुवारी रोजी झाला तसेच प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तासिकादेखील सुरू झाल्या.
या वेळी मंचावर उप अधिष्ठाता (पदव्युत्तर) डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ. अरुण कसोटे, शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता सुलक्षणे, जनऔषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. बिना कुरील, जीवरसायनशास्त्र विभागाच्या डॉ. धनश्री चौधरी उपस्थित होते. प्रथम दीपप्रज्वलन करून धन्वंतरी पूजन करण्यात आले.
यानंतर डॉ. कसोटे यांनी प्रस्तावनेत, महाविद्यालयाविषयी माहिती सांगून सहा दिवसांच्या फाउंडेशन कोर्सविषयी सांगितले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, या महाविद्यालयाच्या परिसरात आपण उच्च शिक्षण घेण्यासाठी आला आहेत. येथे शिस्त व अभ्यासाचे नियोजन तुमच्या भविष्यातील करिअरला आकार देईल. रोज वृत्तपत्रे वाचा, ज्ञानपूर्ण घडामोडी पहा. वैद्यकीय क्षेत्र हे एक ‘नोबेल प्रोफेशन’ असून, ज्ञान, कौशल्याच्या बळावर नाव कमवा. यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत राहा, असा सल्ला दिला. डॉ. मोनिका युनाती यांनी सूत्रसंचालन केले.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा परिसर सोमवारी विद्यार्थ्यांनी गजबजला. कोरोना महामारीमुळे मागील आठ महिने बंद
असलेले महाविद्यालय अखेर खुले झाले. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसह प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या देखील तासिका सुरू झाल्या आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पहिलेच वर्ष आणि पहिलाच दिवस होता. एकूण १५० विद्यार्थी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशित आहेत. पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सोडण्यासाठी विविध प्रांतातून पालकदेखील आले होते.