जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा सहकारी दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सभेत संस्थांना त्यांच्या भाग भांडवलावर १० टक्के लाभांश अदा करण्यात आला आहे. यासह नफा वाटणी करतांना ६० टक्के रिबेट देण्यात आला. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २० टक्के दूध संकलन कमी झाले आहे. यामुळे संघाचे भागभांडवल वाढविण्यासाठी प्रती लिटर १० पैशांवरून २० पैसे कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
दूध संघाच्या नवीन इमारतीमध्ये ऍपद्वारे ही सभा घेण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनीताई खडसे यांनी अहवालाचे वाचन करीत संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. संस्थेच्या ६४० संस्था सभासद झालेल्या आहेत, त्यात ६४ नवीन आहेत. २ लाख ६० हजार ९३० लीटर प्रती दिन दूध संकलन झाले असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २० टक्के दूध संकलन कमी झाल्याची माहितीही देण्यात आली. २ लाख २९ हजार ३० लीटर विक्री झाली आहे. वार्षिक उलाढाल ५०६ कोटी ३३ लाख इतकी झाली आहे. यात ३१७ कोटी ४१ लाख नफा झालेला आहे. यामुळे संघाला अ वर्ग ऑडीट मिळाल्याची माहितीही संघाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
दूध शीतकरण केंद्र, मुख्यालयातील मशिनरी बदलण्यासाठी, आवारातील कॉक्रिट रोड व टँकर पीसीसी यासाठी २ कोटी २४ लाख २७ हजार खर्च झाला. राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत २४ कोटी ४८ लाख अनुदान मंजूर झाले असून २२ कोटी अनुदास संघास प्राप्त झाले आहे. प्रकल्पासाठी ७७ कोटी ४१ लाख खर्च अपेक्षित असून ४४ कोटी ४२ लाख इतकी रक्कम राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून अल्प व्याजदराने दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणून मंजूर करण्यात आलेले आहे. संघाच्या हिस्स्याची १२ लाख ५२ कोटी पैकी ८ कोटी स्वत:च्या भागभांडवलातून दिले असल्याची माहितीही दूधसंघाने दिली आहे. सभेस संचालक आमदार राजूमामा भोळे, अशोक पाटील, अशोक चौधरी, श्रावण ब्राम्हे, प्रल्हाद पाटील, मधुकर राणे, जगदीश बढे, सुभाष टोके, शामल झांबरे, सुनीता पाटील, प्रमोद पाटील यांनी सहभाग घेतला.
चाळीसगावात शितकरण केंद्र उभारणार
चाळीसगाव येथे १ लाख लिटर्स क्षमतेचे शितकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.याशिवाय लोणी व बटर साठवणुकीसाठी प्रत्येकी २ हजार टन क्षमतेचे गोडावून तयार करणे,२० टन क्षमतेचा दूध पावडर बनविण्याचा कारखाना उभारणे.पेढा, रसगुल्ला, गुलाब जामुन व कलाकन इ. देशी मिठाई तयार करण्यासाठी संयत्र बसविणे.