जळगाव, प्रतिनिधी । शहरातील बालनाट्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे जुने जाणते रंगकर्मी संजय निकुंभ यांच्या समता नगर परिसरातील धामणगाव वाडा भागातील पार्टीशन वजा पत्रीघरावर अतिवृष्टीदरम्यान अंगणातील झाड कोसळून घर जमीनदोस्त झाले.
या दुर्घटनेत संजय निकुंभ हे त्यांच्या कुटुंबियांसह थोडक्यात बचावले आहे. झाड कोसळण्याच्या काही क्षण आधी संजय निकुंभ तांदूळ धुण्यासाठी म्हणून घराबाहेर आले होते. घराच्या आतील खोलीवर मागील बाजूस राहणाऱ्या श्री.तडवी यांच्या अंगणातील झाड वादळी पावसाने कोसळले.
झाड कोसळल्याने संजय निकुंभ यांच्या घराचा सरा तुटून पत्रे व दगडगोटे घरावर पडून त्यांच्या संपूर्ण घराचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढील खोलीत बसलेले संजय निकुंभ यांचे वडील थोडक्यात बचावले आहे. झाड कोसळल्यानंतर निकुंभ यांच्या परिवाराला आजूबाजूच्या राहिवाशांनी तातडीने मदत करुन सहकार्य केले. तसेच त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे.