वाघनगरात ३० हजार नागरिकांना आजपासून मिळणार वाघूरचे पाणी

0
10

जळगाव ः प्रतिनिधी
शहराला लागून असलेल्या वाघनगर आणि परिसरातील जनतेसाठी वाघूर धरणावरून पाणीपुरवठा करण्याची योजना पूर्ण झाली आहे. शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. योजना कार्यान्वित झाल्याने परिसरातील ३० हजार नागरिकांची भटकंती थांबणार आहे.
वाघनगरसह परिसरातील कॉलन्या या महापालिका हद्दीत असल्या तरी त्यांचा समावेश जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होतो. सावखेडा ग्रामपंचायतीच्या या भागासाठी वाघूर धरणावरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या या योजनेची दोन दिवसांपूर्वी चाचणी यशस्वी झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ही योजना कार्यन्वित करण्यात आली.
गेल्या निवडणुकीत ही योजना पूर्ण करण्याचे आश्‍वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. वाघूर धरणातल्या जॅकवेलमधून थेट वाघनगरात पाणी आणण्यासाठी कंडारी, उमाळा, रायपूर, कुसुंबा,मेहरूण आदी शिवारांमधून २६.६५ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. जॅकवेलमधून पाणी उमाळा येथील टाकी, नवीन रायपूर ब्रेक प्रेशर टँक, दौलतनगर टाकी, मग कोल्हे हिल्स परिसरातील प्रकल्पात आणून पुढे दुसर्‍या टाकीद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.
यांची होती उपस्थिती
योजनेच्या लोकार्पणप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील,आमदार राजूमामा भोळे, पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, नगरसेवक गणेश सोनवणे, संतोष पाटील, नगरसेविका उषा पाटील, मजिप्राचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, सहायक अभियंता एस. व्ही. चौधरी, उपअभियंता बी. जी. पाटील, शाखा अभियंता एन. बी. चौधरी व कॉन्ट्रॅक्टर गणेश चव्हाण, आर. जी. राजपाल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here