जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात वसुलीसाठी गेलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सागर प्रल्हाद पाथरवट (वय-३०) हे मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सहाय्यक अभियंता रोहित गोवे यांच्यासह बळीराम पेठेत वसुलीसाठी गेले होते. गंगाराम देवरे यांच्या घरात गणेश वसंत कुलकर्णी हे राहतात. ३२ हजार ६९० वसुली बाकी असल्याने महावितरणच्या पथकाने बिलाबाबत विचारणा केली. कुलकर्णी यांनी नकार दिल्याने पथकाने त्यांचे मीटर काढून मेन सर्व्हिस वायर काढली.
वीज कनेक्शन कट केल्याचा राग आल्याने कुलकर्णी याने शिवीगाळ केली तसेच त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की देखील केली. वादामुळे पाथरवट यांच्या शर्टाचा खिसा देखील फाटला. महावितरण कर्मचाऱ्यांना धमक्या देत पाथरवट यांना चापट मारली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार रवींद्र सोनार करीत आहेत.