जळगाव ः प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि तत्कालीन सरपंच यांनी पदाचा गैरवापर करून शौचालय बांधकाम प्रकरणात अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली होती मात्र दोनवेळा तक्रारी करून देखील दोघांवर कारवाई न झाल्याने अखेर जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी आदेश काढून तत्कालीन ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्त झाला असल्याने त्याच्या भविष्यनिर्वाह निधीच्या पैशातून सुमारे ३९ हजार ९०० रुपये वसूल करून तितकीच रक्कम तत्कालीन सरपंचांकडून वसूल करण्यात यावी असे आदेश सीईओ यांनी ८ डिसेंबर रोजी काढले आहेत.
याबाबत माहिती अशी की,जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी १८ नोव्हेंबर २०२० रोजी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांना वराडसिम येथील तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल निवेदनाद्वारे माहिती दिली होती.यात म्हटले आहे की, वराडसिम ग्रामपंचायतीमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार असून पुराव्याअभावी किंवा तक्रारी दिल्यानंतरही सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही.
गटविकास अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली होती . मात्र त्यांनी शहानिशा करुन याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केलेला आहे. तरी या प्रकाराची दखल घ्यावी व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी पल्लवी सावकारे यांनी केली होती. त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी ८ डिसेंबर रोजी याबाबतचे आदेश काढले असून तत्कालीन ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत राघो सपकाळे हे सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांच्याकडून शौचालयाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत ३९ हजार ९०० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.