भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील वरणगाव रोडवरील नगरपालीकेच्या खुला भुखंड सि.स.नं.२३३१/२ या जागेवरील बेकायदेशीर बांधकाम पाडून सदर जागा नगरपालिकेने ताब्यात घ्यावी यासाठी शहरातील एका सुज्ञ नागरीकाने मुख्याधिकार्यांकडे निवेदन सादर केले आहे. जिल्हाधिकार्यांनी तसेच विभागीय आयुक्तांनी बेकायदेशीर ठराव असल्याचे आदेश देऊनही, तब्बल तीन महिन्याचा अवधी होवूनही त्यांच्या अर्जावर साधी दखलही घेतली न गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ नगरपालिका हद्दीतील नगरपालिकेच्या मालकीचा वरणगाव रोडवरील सि.स.नं.२३३१/२ ही ४०५ चौरस मीटर असा खुला भुखंड होता. सदर भुखंडातील ३४ बाय ३४ फुटाचा भुखंड अफसरखान अस्मतखान यांच्या मागणीवरुन दि.३१ मे १९९६ रोजी तत्कालीन सत्ताधार्यांनी नगरपरिषदेच्या सभेत ऐनवेळचा विषय मांडून ठराव क्र.१८ द्वारे ही मिळकत अफसरखान यांना दिली होती. मात्र सदर ठरावास तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी २१ मे १९९७ रोजी रद्दबातल ठरवत सदर भुखंड पालीकेने ताब्यात घ्यावा असे आदेश दिले होते. या आदेशास नाशिक विभागीय आयुक्तालयात आव्हान देण्यात आले होते. सदर आवाहनाच्या अर्जावर तत्कालीन विभागीय आयुक्तांनी ०८/०४ ऑक्टोबर १९९७ रोजी जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश कायम ठेवत सदर भुखंड नगरपालिका प्रशासनाने ताब्यात घ्यावा असे आदेश दिले होते. सदर वादाबाबत भुसावळ न्यायालयाने नगरपरिषदेस जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार नगरपरिषदेसोबत झालेला भाडेपट्टा करार रद्द करुन भुखंड ताब्यात घ्यावा, असे आदेश दिले होते. दरम्यान, या संपुर्ण कारवाईदरम्यान अफसरखान अस्मतखान यांनी सि.स.नं. २३३१/२ या भुखंडातील ३४ बाय ३४ इतक्या जागेवर बेकायदेशीरपणे दोन मजली ईमारत उभी केली आहे. जनतेच्या हिताच्या दृष्टीने व नगरपालिकेच्या मालमत्ता वाचविण्यासाठी सदर बेकायदेशीर बांधकाम पाडून हा भुखंड पलिकेने ताब्यात घ्यावा. तसेच संबंधित कब्जेदार हा कारवाईसाठी आलेल्या कर्मचार्यांना वारंवार रे.मु.न. १२६/१९९७ च्या निकालाबद्दल गैरसमजुतीने वागून किंबहुना दाव्याच्या हुकुमनाम्याचा गैरअर्थ काढून त्यांना सदर बांधकाम पाडण्याच्या कारवाईला आळा आणत असतो, असे समजते. या परिस्थितीचा सारासार विचार करुन मनपाचा मालकीचा कोट्यावधीचा भुखंड तत्कालीन आयुक्त व तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार खंडीत ठरावाचा आधार घेत बेकायदेशीर बांधकाम तोडून ताब्यात घ्यावा, अशी मागणी अर्जदार दिलीप प्रल्हाद चौधरी यांनी केली आहे.
भुसावळ नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी संदीप चिंद्रेवार यांनी शहरात खुल्या भुखंडासंदर्भात ठोस भूमिका घेत कारवाई केली आहे. या प्रकरणी सुध्दा ते गांभीर्याने लक्ष देवून नगरपालिकेची मालमत्ता ताब्यात घेतील अशी आशा अर्जदाराला आहे.