लोहारा येथे कौटुंबिक वादातून मारहाण

0
34

पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील लोहारा येथील दिव्यांग कापड दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक वादातून मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील लोहारा येथील कापड दुकानदार प्रफुल्ल मांगिलाल राका (वय ५४) कुटुंबासह लोहारा येथे वास्तव्यास आहोत. त्यांची मोठी मुलीचा येवला येथील हितेश विजय श्रीश्रीमाळ याच्याशी विवाह झाला असून तिथे तिला त्रास होत असल्यामुळे ती लोहारा येथे प्रफुल्ल मांगिलाल राका यांच्या घरी राहते. ती सध्या कोरोना पॉझिटीव्ह असल्याने पाचोरा येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे.
दरम्यान, दिनांक १३ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या आसपास प्रफुल्ल राका हे आपली पत्नी व नातवंडांसह घरात असतांना दोन महिला बळजबरीने घरात शिरल्या. त्यांनी आपल्याला साड्या खरेदी करायच्या असल्याचे सांगीतले. याला राका यांनी लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याचे कारण देऊन नकार दिल्यावर त्यांना दमदाटी करण्यात आली. या महिलेने कुणाशी तरी फोनवरून वार्तालाप केला. यानंतर सहा-सात जण घरात आले. यात त्यांच्या मुलीचा पती हितेश विजय श्रीश्रीमाळ, सासरे विजय भंवरलाल श्रीश्रीमाळ, दीर विजय सुयोग श्रीश्रीमाळ यांच्यासह चार जण तोंडाला रूमाल बांधून घरात शिरले. त्यांनी प्रफुल्ल राका, त्यांची पत्नी आणि नातवंडाना मारहाण केली. तसेच त्यांनी कपाटातून पाच तोळ्यांचा चपलाहार आणि २० हजारांची रोकड हिसकावून घेतली. काही वेळात शेजारचे लोक आल्यानंतर हे सर्व जण पळून गेले असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात प्रफुल्ल मांगिलाल राका यांच्या फिर्यादी वरून हितेश विजय श्रीश्रीमाळ, सासरे विजय भंवरलाल श्रीश्रीमाळ, दीर विजय सुयोग श्रीश्रीमाळ यांच्यासह चार अज्ञात पुरूष व दोन अज्ञात महिलांच्या विरूध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविरूध्द भादंवि कलम ३२७, ४२७, ४४८, १४३, १८८, २६९, ३७(१); ३७(३) व १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिगंबर थोरात हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here