जळगाव ः प्रतिनिधी
कोरानाच्या दुसर्या लाटेतील वाढता प्रकोप लक्षात घेता लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत अडीच महिन्यापूर्वी कोविड केअर सेंटर सुरू केले. यात आतापर्यंत ९२० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रूग्णांना कडुनिंबाचे रोपटे देऊन निरोप देण्यात येत आहे.
कोविडची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. प्रशासनासोबतच रुग्णालये, कोविड सेंटर, सेवाभावी संस्था डॉक्टर, परिचारिका, कार्यकर्ते या सगळ्यांचे प्रयत्न व नागरिकांच्या सहकार्याला यश येत आहे. त्यामुळे जिल्हा व शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेतील वाढता प्रकोप बघून लोकसंघर्ष मोर्चाने येथील ‘शासकीय तंत्रनिकेतन’च्या इमारतीत अडीच महिन्यांपूर्वी कोविड केअर सेंटर सुरु केले होते. सेंटरमध्ये आजपर्यंत एकूण ९३६ रुग्ण दाखल झाले आहेत. तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे तब्बल ९२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोविडच्या दुसर्या लाटेत प्राणवायूचे महत्व आणि मूल्य सर्वांनाच लक्षात आले आहे. म्हणूनच सुटी झालेल्या रुग्णांना लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने कडूनिंबाचे रोप दिले जाते. ते जगविण्याचे व वाढविण्याचे वचनही घेतले जाते. नुकतीच सुटी झालेल्या रुग्णांनाही लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने रोप उपलब्ध करून देऊन त्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. या वेळी सचिन धांडे, भरत कर्डिले, पिंटू निंबाळकर, चंदू साळुंखे, कलींदर तडवी, विनायक चौधरी, सीमा तायडे, पूजा लोखंडे, पायल तरडे, सोनाली शिंदे, सोनिया कजबे, दीपाली भालेराव आदी उपस्थित होते.