यावल ः ता.प्रतिनिधी
यावल व रावेर तालुक्यात गेल्या एक ते दोन महिन्यापासून काही खाजगी फायनान्स कंपन्यांच्या एजंटांनी लोनचा ईएमआय हप्ता भरण्याचा तगादा लावल्याने ग्रामीण भागातील महिलांचे, नागरिकांचे, लहान व्ययसायिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जसे काही त्यांच्या आनंददायी जीवनावर विरजण पडले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावल व रावेर तालुक्याचे शासन प्रशासनाकडून कोरोना आटोक्यात आणणेसाठी खुप प्रयत्न सुरु आहेत मात्र लॉकडाऊन काळात अनेकांना लोनचे हप्ते भरणे मुश्किल झाले आहे.लोनचा १ ईएमआय मासिक हप्त्याचा एक दिवस चुकला तर कर्जधारकाकडून ५०० ते २००० हजार रुपयापर्यंत पेनल्टी/व्याज/ किंवा दंड वसूल करण्यात येत असल्याने खाजगी फायनान्स कंपन्यांकडून लोन घेणारे वैतागले आहेत. या अनधिकृत बेकायदेशीर कृत्याला आळा कोण लावणार ?असा प्रश्न यावल-रावेर तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागात उपस्थित केला जात आहे.या लोन ईएमआयच्या तगाद्याने मात्र,सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणेच कठीण झाले आहे, संसार गाडा चालवणेच जिकरीचे झाले आहे,घरात परिवाराला खाऊ घालायचे की ईएमआय भरायचा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून खाजगी फायनान्स कंपन्यांनी किमान कोरोना कालावधीत तरी ईएमआय हप्ते भरण्यास सवलत देऊन पहिला हप्ता चुकल्यावर सुद्धा पेनल्टी किंवा दंड आकारू नये असे बोलले जात आहे.
या परिस्थितीचा विपरीत परिणाम यावल रावेर तालुक्यातील काही महिला बचत गटांवरसुद्धा होत असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे,ते सुद्धा वसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत.महिला मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत?आता यांचे संकट कोण दुर करणार? संबंधित अधिकारी दुर करणार की मंत्री दुर करणार? याकडे मात्र भुसावळ विभागासह संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधून आहे.
महाराष्ट्रात सगळीकडे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्रासह राज्य शासनाने कडक लॉकडाऊन लावले आहे.एकीकडे बाहेरगावी कंपन्यांमध्ये काम करणारे मजुर, कापड दुकानात काम करणारे मजुर,किराणा दुकानांवर काम करणार्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्यांवर कडक लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे.स्वत;चे पोट भरणेही कठीण झाले आहे,तर लोन ईएमआय हप्ते व ईएमआय मासिक हप्ता व त्यावरील दंड पेनल्टी कसे भरतील.या ईएमआय लोन हप्त्यांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता नागरिक व महिलांना जणु आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे चित्र सद्यस्थितीत पहावयास मिळत आहे.
अशा या बिकट परिस्थितीमध्येदेखील यावल व रावेर तालुक्यातील काही ठराविक फायनान्स कंपन्यांनी,एजटांनी लोनधारकांकडे लोनचा हप्ता भरण्यासाठी चकरा मारणे सुरु केले आहे.कडक लॉकडाऊन संचारबंदीत ५ ते ६ एजंट हे लोनधारक महिलांच्या घरोघरी जातांना दिसत आहे.काही वसुली करणारे महिलांशी गैरवर्तणूक करीत असल्याचे सुद्धा बोलले जात असून दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संबंधित अधिकार्यांनी व शासन,प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे लक्ष केंद्रित करून जिल्हाबंदीसह गावबंदी देखील करावी.या गावबंदीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल.जेणेकरुन बाहेरील व्यक्तीला गावप्रवेश बंदी करावी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत सर्वसामान्यांना शासनाने घरातच ठेवावे.परंतु ह्या खाजगी फायनान्स कंपनी एजंटाना मात्र जोपर्यंत लॉकडाऊन आहे,तोपर्यंत तरी सर्वसामान्यांकडुन लोन ईएमआयचे हप्ते सद्यास्थितीत तरी स्थगित करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे संबंधित अधिकार्यांमार्फत काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.