नाशिक : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील क्लस्टर विकासाचे चार कोटी आणि अतिरिक्त सुरक्षेची अनामत रक्कम ३५ लाख रुपये देण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपविभागीय अभियंत्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (वय ५७, रा. अशोकनगर, धुळे) असे संशयित अभियंत्याचे नाव आहे.
नाशिकमधील नातलगाकडे एका खासगी कार्यक्रमासाठी आल्यानंतर तक्रारदाराला फोन करून बोलावून घेत रात्री गडकरी चौकात लाच स्वीकारताना एसीबीने संशयिताला अटक केल्याचे समोर आले आहे. संशयित विसपुते हा बांधकाम विभागात कार्यरत आहे. त्याने सर्वाधिक सेवा धुळ्यात बजावली आहे. धुळ्यातील अशोकनगरमध्ये संशयित वास्तव्यास आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने विसपुतेच्या घराची झडती सुरू केली आहे. घरझडतीत फारसे काही समोर आलेले नाही. संशयित तपासकामात अपेक्षित सहकार्य करीत नसल्याचा दावा एसीबीने केला आहे.