जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई आहे. यात सर्वाधिक त्रास हा रुग्णाच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. त्यातच कोविड रुग्णालयात नातेवाईकांना प्रवेश नसल्याने त्यांना दिवसरात्र रस्त्यावर काढावी लागत आहे. या गंभीर परिस्थिती रुग्णांच्या नातेवाईकांना मदत व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ स्टारतर्फे तीन दिवस पुरेल इतका फराळ व पाण्याचे वाटप करण्यात आले.
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ग्रामीण भागातील बहुतांश गरीब रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईक बाहेरच थांबून आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी सुका फराळासोबत पाण्याच्या बॉटल देखील क्लबतर्फे देण्यात आल्या. तीन दिवस पूरेल इतका फराळ दिल्याने नातेवाईकांना आधार मिळाला. यावेळी क्लबचे अध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, करण ललवाणी व पुनीत तलरेजा व रोटरी क्लब ऑफ स्टारचे पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.