जळगाव ः प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे व्होकेशनल महिन्यानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सहा व्यक्तींना व्होकेशनल अॅवार्ड प्रदान करुन गौरविण्यात आले त्यात चार पिढ्यांपासून पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मुर्त्या घडविणारे सुधाकर दशपुत्रे, पती निधनानंतर दोन मुलींचे संगोपन करीत रिक्षा चालविणार्या लीना सोनवणे, २८ वर्षांपासून टेलरिंग काम करणारे धर्मेद्र चौहान, ऑटोमोबाईल क्षेत्रातील गेव दरबारी,२४ वर्षे अकौटंट म्हणून काम करणारे नागेश सुतार, २७ हजार विद्यार्थ्यांना चित्रकला शिकविणारे तरुण भाटे यांचा कुटुंबीयांसह पुरस्कार, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास रोटरी सेंट्रलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र जैन, अध्यक्ष प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार, मानद सचिव जितेंद्र बरडे, व्होकेशनल कमेटी चेअरमन कमलेश वासवानी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सर्व सत्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र चौधरी संपादीत क्लब बुलेटीनचे प्रकाशन व रोटरी प्रिमीयर लीगमध्ये सहभागी होणार्या रोटरी सेंट्रल क्रिकेट संघाचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आभार स्नेहल शहा यांनी मानले तर सूत्रसंचालन संगिता संघवी यांनी केले.