चोपडा, प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या वतीने शहरातील पंकज विद्यालय येथे १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान मोफत योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या योग व प्राणायाम शिबिराचा समारोप ७ जानेवारी रोजी सकाळी ७:०० वाजता यशस्वीरीत्या करण्यात आला .शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना पूरक व्यायामाबरोबरच विविध प्रकारची योगासने शिकवण्यात आली तसेच प्राणायामाचे प्रकार देखील सादर करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले प्रास्ताविकात म्हणाले ,योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे. नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते .शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते .वजन कमी असल्यास वाढण्यास देखील मदत होते .त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते.
रोटरी क्लब ऑफ चोपडाचे एनक्लेव चेअर एम डब्ल्यू पाटील मनोगतात म्हणाले की, मागील ११४ वर्षापासुन जगभरात व ५० वर्षापासून चोपडा शहर व तालुक्यात रोटरी क्लब ऑफ चोपडा सामाजिक उपक्रमांबरोबर विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे . योग शिक्षकांनी सात दिवसात योग प्राणायाम सोबत आरोग्याची मोठी शिदोरी दिली आहे . योग शिक्षक योगेश चौधरी व योग शिक्षिका श्रीमती गायत्री शिंदे हे दोघे हसतमुख आहेत .त्यांनी सर्वच योगासने उत्कृष्ट सादर केली .त्यामुळे साधकांना सर्वच योगासने सहज करता येणे शक्य झाले. योग शिक्षक योगेश चौधरी व योग शिक्षिका श्रीमती गायत्री शिंदे यांचा रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समारोप कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर एनक्लेव चेअर एम डब्ल्यू पाटील ( सर ) ,रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले, सचिव प्रवीण मिस्त्री , प्रकल्प प्रमुख अर्पित अग्रवाल, रोटरीचे माजी अध्यक्ष विलास पी पाटील ,डॉ संदीप पाटील (सुस्मित हॉस्पीटल ) आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रशांत पाटील यांनी केले तर आभार प्रकल्प प्रमुख अर्पित अग्रवाल यांनी मानले…