चोपडा, प्रतिनिधी । विश्वातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था म्हणून रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय पातळीवर सुपरिचित आहे. जगभरातील शाखांद्वारे विविध क्षेत्रातील सेवाभावी , विधायक उपक्रम राबविणाऱ्या रोटरी क्लब ऑफ चोपडा या संस्थेने नूतन वर्षाची सुरुवात भव्य योग व प्राणायाम शिबिराने केली आहे.
दि. १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे शिबिरात सहभागी होणाऱ्या पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे . शिबिर विनामूल्य असून यात योग, ध्यान, प्राणायामाबद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबिर सर्वांसाठी खुले असून सोबत योग मॅट, सतरंजी ,पाण्याची बाटली इत्यादी आणण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शिबिरार्थींनी सैल कपडे परिधान करून सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे .सदर शिबिर विनामूल्य असून पंकज विद्यालय चोपडा येथे सकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत योगशिक्षक योगेश चौधरी व योगशिक्षिका श्रीमती गायत्री शिंदे योग प्रात्यक्षिकांसह घेत आहेत.
मन आणि आरोग्य निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी योगासनांसह प्राणायामांचे धडे, सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिके गिरवून निरोगी आरोग्याचा संकल्प उपस्थित शिबिरार्थीकडून करण्यात आला तसेच योग साधनेचे महत्त्व स्पष्ट केले .योग शिबिराच्या पहिल्या दिवशी शंभरहून अधिक शिबिरार्थींना सहभाग नोंदवला.
सदर शिबीर दरम्यान कोविड १९ संदर्भाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे त्यात सामजिक अंतर पाळणे , मास्क , सॅनिटायझर इत्यादी बाबींचे पालन करण्यात येत आहे.
सदर शिबिराचे उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले ,सचिव रोटे प्रवीण मिस्त्री, एनकलेव चेअर एम डब्ल्यू पाटील, प्रोजेक्ट चेअरमन रोटे अर्पित अग्रवाल यांसह आदि रोटेरियन उपस्थित होते.