जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील रेणुका नगरात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत घराच्या छतावरील शेडमध्ये असणार्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या आगीने दोन मुलांसह राहणार्या निराधार महिलेचा संसार उघड्यावर आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रेणुका नगरात रहिवासाला असलेले भिकन निंबा चौधरी यांच्या घराच्या वरच्या मजल्याला पार्टीशनच्या घराला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीत लाकडी पार्टीशनचे असलेले अख्खे शेड जळून खाक झाले. दरम्यान, सकाळी घरातून आगीचे लोळ येतांना दिसताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला सुचित करत बोलावून घेतले होते. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तेथे राहणार्या महिलेच्या घरातील जीवनोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. नेमकी आग कशामुळे लागली याबाबत स्पष्ट समजू शकले नसले तरी मिटरच्या वर असलेल्या विजेच्या ताराच्या शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असे प्रथमदर्शी दिसून येत आहे.
आगीत जळून खाक झालेल्या या पार्टीशनच्या घरामध्ये रेखा पिंटू भालेराव ही महिला आपल्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वीच राहण्यास आली होती. या महिलेच्या पतीचे निधन झाले असून ती एकटीच आपल्या दोन्ही मुलांसह या पार्टीशनच्या घरामध्ये वास्तव्याला होती. ही महिला बांधकाम कामगार असून पहाटेच ती कामानिमित्त गाडेगाव येथे गेली होती. रेखा भालेराव या गाडेगावला कामाच्या ठिकाणी पोहचत नाही तोच तिच्या शेजारच्यांनी फोन करुन घराला आग लागल्याची माहिती दिली. ही महिला तातडीने घरी आली मात्र आपल्या घरासह संसार उपयोगी वस्तुंची झालेली राखरांगोळी पाहून महिलेला भोवळ येवून अस्वस्थ वाटू लागले. परिसरातील नागरिकांनी तीला धीर दिला.
रेखा भालेराव यांचा संसारोपयोगी वस्तूंची राखरांगोळी झाल्याने आधीच अत्यंत कष्टमय जीवन जगत असलेल्या या महिलेवर पुन्हा आपत्ती कोसळली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मनिषा पाटील यांनी तात्काळ ५ हजार रुपयांची मदत केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महापौर जयश्री महाजन यांनी तात्काळ आपल्या सहकार्यांसह पिडीत महिलेची भेट घेवून धीर देत मदतीसाठी आश्वस्त केले तसेच झालेल्या नुकसानासंदर्भात शासनातर्फे तातडीने पंचनामा करुन त्या महिलेला योग्य ती मदत केली जाईल, असे उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक गणेश सोनवणे यांनी आगग्रस्त महिलेला ५ हजार रुपयांची मदत केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक प्रशांत नाईक, शोभा चौधरी, ललित धांडे आदींची उपस्थिती होती.