राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीव्र आंदोलन; दरवाढ कमी करण्याची मागणी

0
13

जळगाव : प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढत असताना दुसरीकडे ऐन खरिपाच्या तोंडावर केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या आहेत. या प्रमुख बाबींच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला असून, सामान्य नागरिक, शेतकरी यातून होरपळून निघाला आहे. केंद्र सरकारने ही सर्व महागाई कमी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात आला.
पेट्रोल शंभरीपार गेले आहे. रासायनिक खतांच्या ५० किलोच्या बॅगेमागे ७०० रुपयांपर्यंत किमती वाढल्या आहेत. केंद्र सरकारने नियंत्रणमुक्त केलेल्या किमतीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने पक्ष कार्यालयाबाहेर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, महिला पदाधिकारी मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, संदीप पाटील, अजय बढे, स्वप्निल नेमाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनामुळे नागरिक संकटात असून शासनाने पेट्रोलसह इंधनाचे दर कमी करावे, खतांच्या किमती पूर्वीप्रमाणे कराव्यात या मागण्या या वेळी करण्यात आल्या.
पेट्रोल शंभरी पार गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सोमवारी शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. शंभर रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल खरेदी करणार्‍या ग्राहकांना पंपावर गुलाबाची फुले वाटप करण्यात आली. पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या बॅनरवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेलादेखील गुलाबाची फुले देण्यात आली. या वेळी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, सचिव संदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस अनिल खडसे, सुशील शिंदे, धवल पाटील, अमोल कोल्हे, विधानसभा क्षेत्र प्रमुख रॉकी पाटील, किशोर सूर्यवंशी, हर्षल वाघ, भूषण पवार, योगेश नरोटे, राजू शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
महानगर राष्ट्रवादीतर्फे सोमवारी दुपारी १२ वाजता आंदोलनाची घोषणा केली होती; परंतु ग्रामीण जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी सकाळी ११ वाजताच आंदोलन केले. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार शहर राष्ट्रवादीने शहरात तर ग्रामीणने ग्रामीण भागात आंदोलन करणे अपेक्षित होते; परंतु ग्रामीणने शहरातच आंदोलन केल्याने आम्ही आमचे आंदोलन स्थगित केले. – अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.
इंधन दरवाढविरोधात आंदोलन हे सामूहिक होते. राष्ट्रवादीने पक्ष म्हणून हे आंदोलने केले. संपूर्ण जिल्ह्याचे पक्षाचे मुख्यालय शहरात असल्याने या कार्यालयाबाहेर आंदोलन झाले. आंदोलन नियोजित असल्याने सर्वांना फोन करून बोलावण्यात आले होते. केवळ महानगरचे आंदोलन होते असे नाही, आंदोलनात महानगरचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. – रवींद्र नाना पाटील, जिल्हाध्यक्ष, युवक कॉंग्रेस.
खतांसाठी पथक नेमण्याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी रासायनिक खतांच्या किमती भरमसाट वाढवल्या आहेत. केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी खतांच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचे कंपन्यांच्या बैठकीत सांगितले होते. तरीदेखील ऐन पेरणीच्या तोंडावर भाववाढ केली आहे. खतांपाठोपाठ बियाण्यांच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापार्‍यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता आहे. हा काळाबाजार थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय भरारी पथकांची नियुक्ती करावी. खतांच्या लिंकिंगवर नियंत्रण ठेवावे, पेट्रोल-डिझेलच्या किमती मागे घेण्यात याव्या, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, अशोक पाटील, अरविंद मानकरी, संजय चव्हाण, सुशील शिंदे, अमोल कोल्हे, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here