रावेर पोलिसांना वरिष्ठांचे अभय !

0
56

रावेर :  तालुका प्रतिनिधी
मध्यप्रदेशातून कोट्यवधी रुपयांची ब्राऊन शुगर घेऊन जळगाव जिल्ह्यात आलेल्या बऱ्हाणपूर येथील महिलेस जळगाव पोलिसांनी रावेर येथे ताब्यात घेत  तिच्याकडून 500 ग्रॅम ब्राऊन शुगरची दोन पाकीटे हस्तगत केल्याच्या कारवाईने स्थानिक गुन्हे शाखेचा नावलौकिक झाल आहे. याविरुद्ध रावेर पोलीस मात्र अवैध धंद्यांना अधिकृत परवानगी देत पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन करीत असतांना खुलेआम दिसून येत आहे.स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी घेत शहरासह तालुक्यात अवैध धंदे चहा व पानटपरीसारखे थाटले आहेत. गंभीर बाब म्हणजे अवैध व्यवसायाच्या प्रसिद्धी माध्यमांनी बातम्या प्रकाशित केल्यावरही नाममात्र कार्यवाहीचा कांगावा करीत रावेर पोलीस आपली आर्थिक पोळी भाजत असल्याची जोरदार  चर्चा रगली  आहे.  वरिष्ठ अधिकारीसुद्धा रावेर पोलीस निरीक्षकांना अभय देत असल्याचे हळूहळू  स्पष्ट  होऊ लागले आहे .
पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर खुलेआम सट्टा ,पत्त्याचे क्लब यासह अनेक अवैध धंदे सुरु आहेत. प्रसिद्धी माध्यमांनी वरिष्ठांच्या समोर खुलेआम याबाबतचे पुरावे देऊनही वरिष्ठ पोलीस अधिकारीही रावेर पोलिसांना पाठीशी घालत असल्याने कुंपणच शेत खात असल्याचा प्रत्यय येत आहे.रावेर शहरसह तालुक्यातील अवैध धंद्यांचा व चालकांचा कायमचा न्यायमोड वरिष्ठांनी करावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे कायदाप्रिय आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या गुडबुकमधील ते अधिकारी असून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे मात्र अवैध धंद्यावाल्यांना पाठीशी घालून अवैध धंद्यांना चालना देण्याचे कामही त्यांच्यामार्फत होत असल्याने त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध धंदे व धंदेवाल्यांना कायम स्वरूपी त्यांनी हद्दपार करावे अशी अपेक्षा  व्यक्त केली जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत असतांना अवैध धंदेवाल्यांजवळून त्यांचीच एक टीम दरमहा हप्ता गोळा करत असल्याची जोरदार  चर्चा सुरु असून तसे चित्र समोर येऊ लागले आहे.अवैध धंद्यांचा आता चक्क हेरॉईनसारख्या अमली पदार्थाचा साठाच रावेर पोलीस स्थानकाच्या हद्दीतून हस्तगत केल्याने रावेर पोलीस व रावेर शहर यात वाढती गुन्हेगारी व वाढते अवैध धंद्यांंचा राज्यस्तरीय केंद्रबिंदू म्हणून रावेर शहराकडे पाहिले जात आहे.या प्रकरणी जिल्हा अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी तातडीने व गोपनीय पद्धतीने लक्ष देऊन अवैध धंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त  करावा अशी अपेक्षा रावेरवासियांकडून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here