रावेर, प्रतिनिधी । शहरात नगर पालिकेच्या हद्दीत मर्कज मशिदीजवळ सुरू असलेले काँक्रिटीकरण व गटार बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे हाेत असून ही कामे त्वरित थांबवण्यात येऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने निधी वाया जाण्याची शक्यता आहे. मर्कज मशिदीजवळ काँक्रिटीकरण करताना बांधकामाच्या नियमांना डावलून ठेकेदार जमिनीवर खडी पसरवून त्यावर केवळ काँक्रीट टाकत आहे. याबाबत ठेकेदाराला जाब विचारला असता तुम्हाला जे करायचे ते करा, हे काम असेच होईल, असे उत्तर दिले जात आहे. तर मदिना कॉलनीतील गटारीचे बांधकाम व काँक्रिटीकरणाचे कामही याच पद्धतीने पूर्ण केले आहे.
ईदगाह रोडवरील हुसेनी मशिदीजवळ काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या सर्व कामांची चौकशी करावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी उपस्थित होते. पुरवठा अधिकारी डी.एस. सूर्यवंशी यांनी मेहमूद शेख यांचे निवेदन स्वीकारले.