जळगाव : प्रतिनिधी
भाजपा सांस्कृतिक सेलच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवगान स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा नुकताच सातार्यात झाला. याप्रसंगी भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, छत्रपती उदयनराजे भोसले, सांस्कृतिक सेलचे प्रदेश प्रमुख शैलेश गोजमगुंडे, कांता नलावडे, भरत पाटील, लक्ष्मण सावजी, नंदेश उमाप, सौ. विनता जोशी, विसुभाऊ बापट उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १५ हजार कलावंतांच्या सहभागाने ३९ ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतून, वैयक्तिक व सांघिक मिळून ७८ संघ अंतिम फेरीत पोहचले होते. परंतु राज्यातल्या ठाकरे सरकारने कोविडचे कारण पुढं करत शिवजयंती साजरी करण्यावर घातलेल्या बंधनांना झुगारत, भाजपा सांस्कृतिक सेलने शिवगान स्पर्धेची अंतिम फेरी किल्ले अजिंक्यताराच्या साक्षीने सातार्यात पार पाडली.
या वेळी परिक्षक नंदेश उमाप यांनी पोवाडा सादर केला तर दुसर्या परिक्षक स्वातत्र्यवीर सावरकारांची नात सौ. विनता जोशी यांनी शिवरायांची आरती सादर केली.
संबंध महाराष्ट्रातील गायक कलावंतांनी याला भरभरुन प्रतिसाद दिला. या स्पर्धेत समूह गायनातील रु. एक लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राचा मानकरी विजेता सामगंध कला केन्द्र,पनवेल जि. रायगड उत्तरचा संघ ठरला तर रु. पंच्याहत्तर हजार रु. एकावन्न हजार व स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्राच्या द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते अनुक्रमे शिवकल्याण राजा( बीड ), मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव हे ठरले तर रु. एकवीस हजार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राचे उत्तेजनार्थ मानकरी अनुक्रमे गंधर्व पृथ्वीराज माळी, सांगली व स्वरश्री ठाणे हे ठरले.
नाशिकची नेहा ठऱली विजेती
वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत नाशिकची नेहा मूर्थी विजेती ठरली. तर द्वितीय व तृतीय क्रमांक आदित्य लिमये, रत्नागिरी व तृतीय आकांक्षा चारभाई,नागपूर हिला मिळाला. तर उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय अश्लेषा कुलकर्णी जालना व सई ठकार हिला मिळाला.
वैयक्तिक पाच विजेत्यांना अनुक्रमे रु. एकेचाळीस हजार, एकतीस हजार, एकवीस हजार, पंधरा हजार, सात हजार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान केले गेले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे यांच्यासह पंकज चव्हाण, उमेश घळसासी, गितांजली ठाकरे, संचित यादव, राहुल वैद्य, सुनील सिन्हा, संजय भाकरे, विशाल जाधव, कुणाल गडेकर, नरेन्द्र आमले, दिपक पवार, मयूर राजापुरे, काजल राऊत, चैत्राली घळसासी, शिरीष चिटणीस, वैशालीराजे घाडगे व सातार्यांच्या सांस्कृतिक सेलच्या टीमने मेहनत घेतली.
तरच देश महासत्ता होईल – उदयनराजे
याचे पारितोषिक वितरण आ. चंद्रकांतदादा पाटील व उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी बोलताना छत्रपती उदयनराजे म्हणाले की, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात पहिल्यांदाच फक्त शिवरायांवरील गीतांची स्पर्धा झाली. आपण शिवरायांच्या विचारांवर चाललो तरच हा देश महासत्ता होईल असे सांगत ते पुढे म्हणाले की, मी शिवरायांचा प्रत्यक्ष वंशज असलो तरी या देशातील प्रत्येक नागरिक हा शिवरायांचा वंशजच आहे, असे मी मानतो.
त्यांना आम्ही मानतो – चंद्रकांत पाटील
यावेळी चंद्रकांतदादा म्हणाले की, शिवरायांच्या नावाने मोठे होणारे आता अजान स्पर्धा भरवतात पण आम्ही शिवगान स्पर्धा भरवली. आमचा मुस्लीम समाजाला विरोध नाही, हिन्दु या शब्दातच सर्वधर्म समभाव दडलेला आहे. जे या राष्ट्राला मानतात, हिन्दुंचा सन्मान करतात. त्यांना आम्ही आपलेच मानतो.
