जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील मजुर वर्गाला एमआयडीसीच्या खुल्या भुखंडामधून रस्ता देण्यात यावा याबाबत मनसे जनहित कक्षाचे महानगराध्यक्ष संदीप मांडोळे यांच्याकडून गेल्या ८ वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. याची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांना स्थळ निरिक्षणाचे आदेश दिले होते, त्या अनुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी नुकतीच एमआयडीसीचे अधिकारी परिसरातील रहिवासी व तक्रारदार यांच्या सोबत प्रत्यक्ष स्थळाला भेट दिली व विकास न झालेल्या खुल्या भूखंडातून कामगारांना ये-जा करण्याकरिता रस्ता देता येईल, याबाबत सविस्तर माहिती घेतली.
दरम्यान, परिसरातील हजारो मजुर ४ कि.मी. च्या फेर्याने एमआयडीसीमध्ये जातात. जास्त संख्येने महिला आहेत. परिसरतील डी ४५/२ हा खुला भूखंड असून उद्योजकाने २० वर्षात त्याठिकाणी कोणताही उद्योग सुरु केलेला नाही. एमआयडीसी नियमानुसार सदर भुखंड जप्त करून त्यामधून कामगारांना, मजुरांना रस्ता द्यावा, अशी मागणी वारंवार मनसेचे संदीप मांडोळे यांनी केली आहे.
सदर परिसरातील पाहणी सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी केली असून त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत निर्णय घेणार आहे. यावेळी एमआयडीसीचे श्री.पारधी, उपअभियंता डी.यु.पाटील, जिल्हा सचिव जमिल देशपांडे, जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष विरेश पाटील, उपजिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, उपशहराध्यक्ष इमाम पिंजारी, जिल्हा संघटक रस्ते आस्थापना राजेंद्र निकम, तालुका संघटक रस्ता आस्थापना महेश माळी, हर्षल वाणी, सामाजिक कार्यकर्ते संजय सपकाळे, डी.आर.पाटील हे उपस्थित होते.