जळगाव ः प्रतिनिधी
अभाविपतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालय उघडण्याकरिता काल राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. कोविडच्या प्रादुर्भावामुळे १७ मार्च २०२० पासून संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालये बंद आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षाचे निकाल घोषित होऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली आणि विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला. साधारणपणे नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू होतील असे अपेक्षित असतांना अद्यापही प्रत्यक्ष शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू झालेले नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यास शासनाची चालढकल सुरू आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी, ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा, त्याची परिणामकारकता इत्यादी बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करून शासन झोपेचे सोंग घेत आहे. तसेच राज्य सरकार द्वारे दारूची दुकाने, मॉल,सिनेमा गृह व परिवहन सेवा आणि राज्यातील पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु केल्या आहेत मग महाविद्यालय बंद का ? असा प्रश्न विद्यार्थी परिषद राज्य सरकारला विचारला आहे.
महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी अभाविप महाविद्यालय लवकरात-लवकर सुरु करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
यावेळी अभाविपचे जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील, जिल्हा संयोजक रितेश चौधरी, सहमंत्री कल्पेश पाटील, आंदोलन प्रमुख संकेत सोनवणे, हेंमागी पाटील, गौरवी चौधरी, भूमिका कानडे, चिराग तायडे, शुभम शुक्ला, रितेश महाजन, जितेश चौधरी, चैतन्य बोरसे, मयूर अलकरी, ऋतिक माहुरकर,नितेश चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.