राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या प्रभावी प्रसिध्दीची गरज
जळगाव ( प्रतिनिधी ) –
जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासंदर्भात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळांच्या विकासावर भर देण्यासह पर्यावरणीय पर्यटनाला (इको टुरिझम) चालना देण्याबाबत चर्चा झाली. पर्यटनस्थळांचे आकर्षक पद्धतीने संवर्धन करतानाच, आधुनिक सुविधा, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजनावर भर देण्याविषयी चर्चा झाली. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांचे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी प्रसिध्दी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
पर्यटनक्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहनासाठी नवीन संधी शोधण्याचेही विचारमंथन करण्यात आले. यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आणि प्राचीन दगडी कोरीव बौद्ध स्मारकांसाठी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जळगावपासून जवळ आहे. तेथे जाणारे पर्यटक जळगावलाच उतरतात. अमळनेरचे मंगळग्रह मंदिर, पद्मालयचा गणपती, पाटणादेवी, उनपदेवचा उष्ण पाण्याचा झरा, सातपुड्यातील मनुदेवी, मुक्ताईनगरचे संत मुक्ताई मंदिर, तापीवरील हतनूर धरण, गारखेडा येथे वाघूर धरणाच्या बुडीत क्षेत्रात उभारलेले बेट, फरकांडे येथील झुलते मनोरे, जळगावमधील जैन मंदिरे, जैन हिल्सवरील गांधी तीर्थ, यावल वन्यजीव अभयारण्य अशी पर्यटन क्षेत्रे जिल्ह्यात आहेत.