मुंबई, वृत्तसंस्था । येथे यशवंतराव चव्हाण केंद्रात राज्य महिला आयोगाचा २९ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी राज्य महिला आयोगाचा इतिहास आणि त्यांनी गेल्या ३ महिन्यात राज्य महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यावर केलेली कामे सर्वांसमोर मांडली. यावेळी महिला आयोगाच्या १५५२०९ या टोल फ्री क्रमांकाचे तसेच कॅलेंडर आणि वार्षिक डायरीचे अनावरण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात सर्वच प्रमुख पाहुण्यांनी गेल्या ३ महिन्यात विविध माध्यमातून महिला आयोग करत असलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलींच्या लग्नाचे वय २१ असावे का १८ यावर साधक बाधक चर्चा व्हायला हवी असे मत मांडले. यामध्ये बरीच मतमतांतरे आहेत परंतु कोणीही फक्त स्वतःचा विचार न करता समाजावर याचा काय परिणाम होईल याचा विचार करून मत मांडावे असे आवाहन केले.
महिलाच महिलांच्या शत्रू असतात हा समाजातील विचार आपण खोडून काढायला हवा. सगळीकडेच ही परिस्थिती नसते. बऱ्याच ठिकाणी महिला महिलांच्या सहकारी असतात असे मत विधानपरिषद उपसभापती, आमदार नीलम गोऱ्हे यांनी मांडले.
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपले मत मांडताना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे. जी महिला आर्थिक दृष्टया सक्षम असते तिच्यावर अन्याय अत्याचार होण्याचे प्रमाण कमी असते असे विचार मांडले
महिला आर्थिक विकास महामंडळच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी रुपाली चाकणकर जेव्हापासून अध्यक्षा झाल्या आहेत तेंव्हापासून महिला आयोगाचे काम वेगाने वाढले असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात पोलीस महासंचालक महाराष्ट्र, संजय पांडे यांनीही यावेळी पोलीस दलातील महिलांचे कामाचे तास ८ तास करण्यात यावा यावर विचार केला जावा असे मत व्यक्त केले. सोबतच सर्व पोलीस ठाण्यात महिलांसाठी स्वच्छता गृह असावीत अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना आयोगाच्या सदस्या सचिव अनिता पाटील तर आभार दीपा ठाकूर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले.