पारोळा : प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दाखवा, आता डॉ. सतिश पाटलांच्या जोडीला खान्देशात नाथाभाऊ आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढलेली असून विरोधी पक्ष किती ही सांगत असेल तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहिल आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच असतील असा दावा करुन भाजपाने राज्यात सत्तेची स्वप्ने पाहु नये असा टोला ना. जयंत पाटील यांनी लगावला.
पारोळा येथील विजयानंद मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत कार्यकर्त्यांनी संवाद साधतांना ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील, गुलाबराव देवकर, आ.अनिल पाटील, माजी आ.मनिष जैन, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी खा.अॅड.वसंतराव मोरे, जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, महेबुब शेख आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ८ ते १० आमदार, खासदार निवडून येत होते मात्र मागील काही निवडणूकीत १-१ आमदार निवडून येतोय याचे कारण शोधत न बसता आता महाविकास आघाडीचे सरकार आहे त्यात आपला पक्ष असल्याने आता कार्यकर्त्यांनी आपली मरगळ झटकून पक्ष संघटन वाढीसाठी कामाला लागा, असे सांगून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. आपल्या मतदार संघात शिवसेनेचे आमदार जरी असले तरी त्यांचे काम ते करतील पण आपण स्वस्था बसू नका असा इशारा देवून ते त्यांचे काम करतील आपण घराघरात जाऊन राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम करा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री डॉ. सतिश पाटील यांनी सांगितले की माझा पराभव झाला याचं शल्य आज पण बोचत असून आपण मागील नगरपालिका निवडणुकीत शहर विकास आघाडी बरोबर युती करुन शहरात आठ ते दहा नगरसेवक निवडून आले मात्र ज्या आघाडीच्या नेत्याबरोबर युती केली तोच माझ्या विरोधात निवडणुकीत उभा राहिला त्याला मिळालेल्या मतामुळेच माझा पराभव झाल्याचे सांगत येणार्या निवडणुकीत पक्षाने बळ दिल्यास नगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणूका राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढविणार असल्याचे मत व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या ५८ ग्रामपंचायत निवडणुकीत ३४ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून मंत्री जयंत पाटील यांच्याकडे इशारा करीत पालकमंत्री नियुक्त्या करीत नसून जिल्हाध्यक्षाकडे नावे दिलेली असतांना वेळ का होतोय असा प्रश्न उपस्थित केला. तसेच रखडलेल्या कामांना विकास निधी उपलब्ध करुन द्या, ग्रामपंचायतच्या विकासासाठी निधी द्या, अशी मागणी यावेळी जयंत पाटील यांच्याकडे डॉ.सतिश पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, हिंमतराव पाटील, तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, अमित पाटील, डॉ.शांताराम पाटील, महिला तालुकाध्यक्षा अॅड. माधुरी पाटील, चंद्रकांत पाटील, पं.स. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश जाधव, दिगंबर पाटील, अॅड. सतिश पाटील, नगरसेवक रोहन मोरे, पराग मोरे, एरंडोल नगरसेविका वर्षा शिंदे, किशोर पाटील, दगडू चौधरी, मंजुषा देसले, नगरसेवक अस्तम पिंजारी, कपिल पवार, सुवर्णा पाटील, अमृता मुंदाणकर, सुनंदा शेंडे, सुनिता शिंपी आदी उपस्थित होते.