राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार

0
18

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातील महाविकासआघाडी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत.

आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. करोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली गेली आहे.

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केलेले आहेत. मात्र असं असलं तरी सरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे हाल होत होते. सरकारचं लक्ष याकडे वेधण्यासाठी राज्यात कलाकर व या क्षेत्राशी निगडीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यात ठिकठिकाणी आंदोलनं केले होते. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १ सप्टेंबरपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही घोषणा हवेत विरल्याची भावना या आंदोलकांमध्ये व कलाकारांमध्ये होती. याच पार्श्वभूमीवर पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात नटराजाची महाआरती देखील करण्यात आली होती. सरकारला जागं करण्यासाठी जागर आणि गोंधळाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here