मुंबई, वृत्तसंस्था । कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पुणे शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत करणाऱ्या पुणे महापालिकेतील तेव्हाच्या अतिरिक्त आयुक्त आणि आता राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांना प्रशासकीय सेवेतील मानाचा राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराचा मान मिळाला आहे. कोरोना काळातील व्यवस्थानाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अग्रवाल यांच्यासह गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
अरुण बोंगिरवार फाऊंडेशनच्या वतीने येत्या सहा जानेवारीला आयोजिलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुण्यात मार्च २०१९ मध्ये कोरोनाचा पहिल्या रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य व्यवस्थापनाची जबाबदारी अग्रवाल यांच्याकडे आली. रुग्णांसाठी बेड मॅनेजमेंटपासून उपचार व्यवस्था, गरीब रुग्णांसाठी जम्बो कोविड सेंटरची उभारणीसह त्याच्या व्यवस्थापनात अग्रवाल पुढाकार होता. रुग्णसंख्या आणि त्यापाठोपाठ मृत्यूदर वाढल्यानंतर नव्या हॉस्पिटलची उभारणी करून कमीत कमी कालावधीत रुग्णांसाठी बेड पुरविण्याला त्यांचे प्राधान्य होते. त्यात, खासगी हॉस्पिटलमधील बेड ताब्यात घेऊन रुग्णांवरील उपचारास व्यवस्थापनाला भाग पाडले. ज्यामुळे पुणे आणि आजूबाजुच्या जिल्ह्यांतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना धोका होऊ नये, म्हणून ऑक्सिजन बचतीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला. अशातच खासगी हॉस्पिटलमधील आक्सिजन संपल्याने मृत्युशी झुंज देणाऱ्या ९ रुग्णांना दीड तासांत महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आणण्याचे धाडस अग्रवाल यांनी केले होते.
जम्बो कोविड सेंटण आणि सरकारी रुग्णालयांतील मृत्यूदर कमी करण्याच्या हेतुने पुरेशा प्रमाणात डॉक्टरांची उपलब्ध करण्यावर त्यांचा भर होता. दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ‘रेमडेसिव्हिर इंजक्शन’चा काळाबाजार रोखण्यासाठी अग्रवाल यांनी स्वतंत्र यंत्रणांना उभारून त्याचे नियोजन केले होते. दरम्यान, ‘म्युकरमायकोसिस’ च्या संसर्गाच्या भीतीने रुग्णांत प्रचंड भीती पसरली असतानाच त्यांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ चा स्वतंत्र विभाग सुरू केला.