जळगाव ः प्रतिनिधी
विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचे सोमवारी पोलिस मुख्यालयातील वसाहतीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी या बाजारात शेतकर्यांकडू थेट ग्राहकांनी ९० ते ९५ हजारांचा शेतमाल खरेदी केला.पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक यांच्या प्रयत्नाने थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेवर आधारित हे शेतमाल विक्री केंद्र आहे. या केंद्रात शेतकर्यांनी सेंद्रीय केळी, पपई, पेरू, मेहरूणची बोरे, भाजीपाल्यामध्ये हादगा, शेवगा, भरीत वांगे, कांदा, मशरुम तसेच हिमाचल प्रदेशातील शुद्ध मध, केळीवर प्रक्रिया केलेले पदार्थ, गीर गाईचे तूप इत्यादी २४ स्टॉलमध्ये विक्रीसाठी आणलेले होते.
पोलिस वसाहतीतील नागरिकांनी येथून ९० ते ९५ हजार रुपयांचा शेतमाल खरेदी केला.जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह अधिकार्यांनीही शेतमाल खरेदी केला. या योजनेंतर्गत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे उत्पादित शेतमाल थेट विक्रीव्दारे ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. पोलिस वसाहतीतील कुटुंबांना उच्चप्रतीचा शेतमाल मिळाल्याने समाधान व्यक्त केले.
दर आठवड्यातून दोन दिवस शेतमाल विक्रीसाठी नियोजन यशोदाई शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक नीलेश पाटील व आव्हाणे येथील शेतकरी समाधान पाटील हे करणार आहेत.
या कार्यक्रमास सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे आदी उपस्थित होते.