भुसावळ ः प्रतिनिधी
कोविडच्या काळात घराची सर्वाधिक जबाबदारी महिलांवर आहे अशा वेळी प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शहरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ.चारुलता पाटील यांनी केले. भुसावळ येथील कला, विज्ञान व पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात आयोजित ऑनलाईन व्याख्यानात डॉ.पाटील यांनी महिलांना आपल्या आरोग्याच्या काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन प्रसंगी बोलत होत्या.
नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या महीला कल्यान समितीतर्फे सदरचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कोविडच्या काळात घराची सर्वाधिक जबाबदारी महिलांवर आहे अशा वेळी प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. योगा, एरोबिक, झुंबा, जिम अशा वेगवेगळ्या माध्यमातून महिला स्वतःचे आरोग्य सुधारू शकतात. शिवाय प्रत्येक महिलेसाठी शारीरिक आरोग्यासोबतत मानसिक, सामाजिक व आर्थिक आरोग्य देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत असे त्यांनी विविध दाखले देऊन पटवून दिले. आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रथम पाऊल म्हणजे तुमचा दिनक्रम तुम्ही सकाळी लवकर उठून चालणे, फिरणे, धावणे, योगा यासारखे व्यायाम प्रकार करून दिवसभर मन प्रसन्न ठेवणे होय. तसेच शक्यतोवर रात्री लवकर झोपणे उपयुक्त आहे. त्यासाठी रात्री मोबाईल कमीत कमी वेळ बघावा असा सल्ला त्यांनी उपस्थित प्राध्यापिका व विद्यार्थिनींना दिला. शिवाय मोठ्या संख्येने विद्यार्थिनी या व्याख्यानात सहभागी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.
सुरुवातीस डॉ. स्वाती फालक यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महिला कल्याण समितीच्या चेअरमन प्रा.डॉ.गौरी पाटील यांनी केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समिती सदस्य प्रा.डॉ.स्मिता चौधरी, प्रा.डॉ.विद्या पाटील, प्रा.डॉ.रश्मी शर्मा, प्रा.डॉ.ममता पाटील,प्रा पूनम महाजन, प्रा.संगीता भिरूड यांनी सहकार्य केले.